West Bengal : TMC च्या MP शताब्दी रॉयने दिले बंडखोरीचे संकेत, उद्या धमाका करणार, ममता बॅनर्जीचे टेन्शन वाढले

कोलकाता : वृत्तसंस्था – पश्चिम बंगालमध्ये एप्रिल-मे मध्ये विधानसभा निवडणुका होत असून भाजपने ममतांचं सरकार उलथवून टाकण्याचा चंग बांधला आहे. त्यामुळे येथील येथील राजकीय वातावरण तापू लागले आहे. आतापासूनच फोडाफोडीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे तृणमूलच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या अडचणींत वाढ होऊ लागली आहे. राज्य सरकारमधील एक बडा मंत्री आणि काही आमदार सोडून गेल्यानंतर आता टीएमसीच्या खासदार आणि बंगाली फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिध्द अभिनेत्री शताब्दी रॉय यांनी देखील बंडखोरीचे संकेत दिले आहेत. याबाबत शनिवारी (दि. 16) त्या मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

खासदार शताब्दी रॉय यांनी आपल्या एफबी पोस्टवर व्यक्त होत पक्षातील काही नेते त्यांना कमी लेखू लागल्याचा आरोप केला आहे. यामुळे राजकीय भविष्यावर त्या मोठा निर्णय घेण्याची शक्यता असून त्यांनी शनिवारी (दि. 16) दुपारी 2 वाजताची वेळ दिली आहे. खा.शताब्दी यांनी म्हटले की, लोक मला विचारतात की पक्षाच्या बीरभूममधील कार्यक्रमांना का येत नाही. मी कशी सहभागी होणार, जर मला त्यांचे शेड्यूलच माहिती होत नाही. मला वाटते काही लोकांना मी तिथे असावे असे वाटत नाही. टीएमसीच्या सूत्रानुसार 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर शताब्दी रॉय फार कमी कार्यक्रमांमध्ये दिसल्या. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या बीरभूमच्या रॅलीमध्ये त्या आल्या होत्या. ममता यांनी या रॅलीमध्ये त्यांना महत्व दिले होते. तसेच रॅलीमध्ये त्यांचे नावही घेतले होते.

खासदार निधी परस्पर वाटला, स्थानिक नेते नाराज
शताब्दी रॉय यांनी खासदार निधी लोकांमध्ये विकासकामांसाठी परस्पर वाटला होता. यामुळे स्थानिक नेते नाराज होते. शताब्दी यांनी असे करताना स्थानिक नेत्यांचे मत विचारात घेतले नाही. यामुळे त्यांना बाजुला ठेवण्यास सुरुवात झाली आहे. शताब्दी रॉय या 2009 पासून टीएमसीच्या खासदार आहेत. बीरभूममधून त्यांनी निवडणूक लढविली होती. यानंतर त्या 2014 आणि 2019 मध्ये निवडणूक लढविली होती.