सहकार मंत्र्यांची लुटारू साखर कारखानदारांना साथ : खा. राजू शेट्टी

सातारा : पोलीसनामा आॅनलाईन – साखर कारखान्यांकडून ऊस उत्पादकांचे कोट्यवधी रुपये येणे बाकी आहे. पैसे देण्याची जबाबदारी या सरकारची असून देखील हे सरकार व त्यांचे मंत्री कारखानदारांना पाठीशी घालत आहेत. कारखान्याचे लिलाव करून पैसे शेतकऱ्यांना देण्याची जबाबदारी सरकारची असते. परंतु, सहकार मंत्री सुभाष देशमुख हे लुटारूंच्या बाजूने आहेत, असा गंभीर आरोप खा. राजू शेट्टी यांनी केला आहे. सदाभाऊ खोत यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यासाठी या सरकारमणून खूप प्रयत्न सुरू आहेत. यामुळे शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या मंत्र्यांच्या पाठीशी हे भाजप सरकार मेहरबान असल्याचा चिमटाही शेट्टी यांनी काढला.

खासदार शेट्टी यांनी फलटण येथे पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, हे सरकार उद्योगपती, श्रीमंतांचे आहे. सध्या राज्यातील शेतकरी दुष्काळामुळे त्रस्त असून आर्थिक संकटात सापडले आहेत. शेतकऱ्यांची ही आवस्था असूनही राज्यातील साखर कारखानदार मस्तीत वागत आहेत. शेतकऱ्यांचे देणी देण्यास विलंब करत आहेत. सरकार त्यांच्या पाठीशी असल्यानेच ते असे वागत आहेत. सरकारने अशा कारखानदारांवर कारवाई केली पाहिजे. आता त्यांच्या विरोधात यापुढे मोठा संघर्ष उभा केला जाणार आहे. राज्यातील अनेक कारखाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फसवत असतानाही सहकारमंत्री भेट न देता व निवेदन न स्वीकारता पळून जात आहेत. हे मंत्री फसवत शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत.

न्यू फलटण शुगरचा साखर आयुक्तांनी लिलाव करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पैसे देणे गरजेचे असताना गेली आठ ते दहा महिने उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. खोटे धनादेश देवूनही सहकार आयुक्त व साखर आयुक्त कारवाई करताना दिसत नाहीत. जर एखाद्या कारखान्याचा लिलाव काढायचा म्हटले की उलट तो थांबवला जातो. यामुळे सहकार खाते हे शेतकऱ्यांना सहकार्य करण्याऐवजी कारखानदारांना मदत करत आहे, असा आरोप शेट्टी यांनी केला.

जाहिरात