मी ब्राह्मण, नावापुढे चौकीदार लावणार नाही : भाजपच्या ‘या’ जेष्ठ नेत्याचे वक्तव्य

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपाने ‘मैं भी चौकीदार’ मोहीम सुरू केली. ही मोहीम सुरू होताच भाजपा नेत्यांपासून समर्थकांनी सोशल मीडियावर आपल्या नावाआधी चौकीदार शब्द लावला. मात्र भाजपाचे वरिष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी आपण ब्राम्हण असल्याने नावापुढे चौकीदार केले नसल्याचे स्पष्ट केले आहे. मी ब्राह्मण आहे आणि चौकीदाराने काय काम करावे हा आदेश देण्याचे माझे काम आहे, म्हणूनच मी माझ्या नावापुढे चौकीदार लावू शकत नाही, असे वक्तव्य एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना सुब्रमण्यम स्वामी यांनी केले आहे. स्वामींचे हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

तामिळनाडूतील एका वृत्तवाहिनीने घेतलेल्या मुलाखतीमध्ये भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांना नावापुढे चौकीदार का लावले नाही असे विचारण्यात आले. त्यावर स्वामी म्हणाले की, ‘मी माझ्या नावाच्या आधी चौकीदार शब्द लावलेला नाही. मी ब्राह्मण असून चौकीदाराने काय करायचे आहे, याचा आदेश मी देईन. त्यामुळे माझ्या नावाआधी मी चौकीदार लावू शकत नाही.’

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष प्रचार आणि प्रसारामध्ये सक्रिय झाले आहेत. ‘चौकीदार चौर हैं’ ला प्रत्युत्तर म्हणून ‘मैं भी चौकीदार’ अशी मोहीम भाजपने सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मोहिमेला आपल्या ट्विटर अकाउंटवरून सुरुवात करून दिली. या मोहिमेतंर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यासह पक्षाच्या अनेक नेत्यांनी ट्विटरवर आपल्या नावापुढे चौकीदार अशा शब्द जोडला.

You might also like