सुप्रिया सुळेंनाही आवडला रॅप साँगमधला गोडवा; म्हणाल्या – ‘खास रे… चांगल्या गाण्याची तहान भागवणारा हा ‘ऊसाचा रस’ एकदा ऐकाच’ (Video)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोनाने थैमान घातले आहे. सध्या सर्वत्र केवळ कोरोनाच्या बातम्या माध्यमांमध्ये दिसून येत आहे. ऑक्सिजन, रेमेडीसीवीर, बेड, औषधांचा तुटवडा आदीमुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. मात्र असे असतानाच सोशल मीडियात सध्या व्हायरल होणाऱ्या एका मराठी रॅप साँगने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. कोरोनाच्या नकारात्मक बातम्यांमध्ये ऊसाच्या रसाचा गोडवा सर्वांनाच भूतकाळात घेऊन गेला आहे. खास रे या युट्यूब चॅनेलच्या कलाकारांनी बनवलेल्या रॅप साँगने नेटीझन्सना ऊसाच्या रसाची आठवण करुन दिली आहे. ऊसाचा रस म्हणून बनवलेला हा रॅप सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील हे गाणं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केले आहे.

 

 

 

 

 

कडाक्याच्या उन्हात ऊसाचा रस तहान भागवितो. उन्हाळ्यात रस पिण्याची ही मौज न्यारीच आहे. याच सगळ्या भावना गीताच्या माध्यमातून खास रे ने उसाचा रस गाण्यातून मांडल्या आहेत. चांगल्या गाण्याची तहान भागविणारा हा ऊसाचा रस एकदा नक्की ऐकाच, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी खास रेच्या टीमचे कौतुक केले आहे. दरम्यान खास रे हे सोशल मीडियावरील लोकप्रिय डिजिटल माध्यम आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शीच्या संजय श्रीधर यांनी हे चॅनेल सुरू आहे. यापूर्वी त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील डोनाल्ड तात्या’चे मिम्स आणि व्हिडिओ बनवले होते. आपल्या कलाकृतीतून ते नाविन्य जपत वेगवेगळे प्रयोग करतात. आता संजय आणि त्यांच्या टीमने बनविलेला हा ऊसाच्या रसाचा रॅप सध्या सोशल मीडियावर गोडवा निर्माण करत आहे.