PM केअर फंडाबाबत इतकी गोपनीयता का ?, खा. सुप्रिया सुळे यांचा लोकसभेत प्रश्न

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात ‘पंतप्रधान सहाय्यता निधी’सारखी मजबूत व्यवस्था असताना ‘पीएम केअर फंड’ का सुरु करण्यात आला. शिवाय पीएम केअरबाबत कसलेही प्रश्न उपस्थित करण्याची सोयही ठेवली नाही. अशी गोपनियता का पाळली जातेय, असा प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांनी आज लोकसभेत उपस्थित केला. याबाबत पारदर्शकता आणावी लागेल, असेही त्या म्हणाल्या.

लोकसभेत आज संसद सदस्यांचे पगार, अलाऊन्सेस व पेन्शन (सुधारणा) विधेयक २०२० यावर बोलताना सुळे यांनी पीएम केअर फंड आणि खासदारांच्या वेतनात होणाऱ्या कपाती बाबत भाष्य केले. त्या म्हणाल्या. देशाची सध्याची आर्थिक स्थिती पाहता खासदारांच्या वेतनात होणारी कपात योग्य असून त्याला आमचे पुर्ण समर्थन आहे. यावेळी त्यांनी माजी राष्ट्रपती स्व. प्रणब मुखर्जी यांची आठवण करुन दिली. ते केंद्रीय अर्थमंत्री असताना त्यांनी सर्वच खात्यांचा अनावश्यक खर्च टाळून जास्तीत जास्त काटकसर करण्याच्या सक्त सुचना दिल्या आणि त्या अंमलात देखील आणल्या होत्या. यातून मोठ्या प्रमाणावर बचत झाली होती. आताच्या परिस्थितीत सरकार अतिरिक्त खर्च टाळून काटकसर करण्याबाबत सरकार का विचार करीत नाही अशी विचारणाही त्यांनी केली.

सरकार सर्वच प्रकारच्या सबसीडींमध्ये कपात करीत आहे. परंतु जगभरात कच्च्या तेलाचे भाव कोसळत असताना भारतात पेट्रोल-डिझेलचे भाव का वाढत आहेत अशी विचारणाही सुळे यांनी केली. आम्ही सर्व खासदार अगदी आनंदाने आमचे मानधन देतोय. एवढंच नाही तर ‘खासदार फंडा’तून देण्यात येणारा निधी इतरत्र वळविण्यापेक्षा तो व्हेंटिलेटर्स, रुग्णालयांमध्ये खाटा वाढविणे, आरोग्यसज्जता यासाठी खासदारांनी आपापल्या मतदारसंघात खर्च करावा, अशी सुचनाही यावेळी त्यांनी केली.