कुरकुंभ MIDC तील उत्सर्जित घातक रसायनावर त्वरित तोडगा काढा स्थानिकांच्या आरोग्याबाबत सुप्रिया सुळेंचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेेेख) – दौंड तालुक्यातील कुरकुंभ एम.आय.डी.सी. मधील काही कंपन्या घातक रसायन जल, वायू अथवा घन स्वरूपामध्ये सातत्याने सोडत असून या प्रदूषणाचा आजूबाजूच्या परिसरातील लोकांना प्रचंड त्रास होत आहे. या भागात सतत दुर्गंधी पसरत असून रोगराई वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, तरी तातडीने यावर योग्य तो मार्ग काढावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्याकडे पत्राद्वारे त्यांनी ही मागणी केली असून कुरकुंभ येथे झालेल्या ‘अल्कली अमाईन्स’ कंपणीमधील आगीसारख्या घटनांची आठवणही करून दिली आहे. रसायनांच्या उग्र वासामुळे एम.आय.डी.सी. पासून तब्बल १२ किलोमीटर परिघामध्ये प्रदूषण झाले आहे. वास्तविक कुरकुंभ परिसरात रासायनिक प्रकल्प सुरु होऊन तीस वर्ष पूर्ण होत आहेत. तथापि या कारखान्यांतून उत्सर्जित होणाऱ्या प्रदूषणावर आजपर्यंत तोडगा निघाला नाही. दिवसेंदिवस हे प्रदूषण वाढतच आहे. मानवी जीवनाबरोबरच पशुपक्षी आणि वनस्पती तसेच शेतीवरही या प्रदूषणाचा घातक परिणाम होत आहे. सुमारे दहा किलोमीटरच्या परिसरातील नैसर्गिक परिस्थिती बदलत आहे. त्यामुळे पुढील काळात येथील मानवी जीवन विविध रोगराई च्या विळख्यात सापडण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असे सुळे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. यंदा स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येलाच १४ ऑगस्ट रोजी कुरकुंभ एम.आय.डी.सी. मधील अल्कली अमाइन्स केमिकल या कंपनीमध्ये आग लागली होती. त्यावेळी आपण घटनास्थळी भेट दिली असता, ग्रामस्थांनी प्रामुख्याने सेफ्टी ऑडीट, महाराष्ट्र पोल्युशन बोर्ड, स्थानिकांना रोजगार, दुषित पाण्याची विल्हेवाट, असे अनेक विषय मांडले होते. या संपूर्ण बाबींचा गांभीर्याने विचार करून पुढील काळात अशी दुर्घटना घडू नये, तसेच परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य तो मार्ग काढावा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्याकडे केली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/