जि.प. निवडणुकीत भाजपला अ’प्रत्यक्ष’ मदत केल्यानंतर CM उद्धव ठाकरेंच्या बैठकीला तानाजी सावंतांची ‘दांडी’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या मराठवाड्यातील बैठकीला शिवसेना आमदार तानाजी सावंत यांनी दांडी मारली आहे. तानाजी सावंत यांची नाराजी कायम असल्याचंच यातून समोर येत आहे. उस्मानाबाद संदर्भातल्या शासकीय बैठकीलाही तानाजी सावंत अनुपस्थित होते. यानंतर आज पुन्हा त्यांनी बैठकीला दांडी मारली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या दोन दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. जिल्हा न्याय अधिकाऱ्यांसोबत त्यांच्या बैठका आहेत. मात्र जिल्हा परिषद निवडणुकीत बंडखोरी केल्यानंतर तानाजी सावंत यांनी मुख्यमंत्र्यांच्या सूचना झुगारून या बैठकीकडे पाठ फिरवल्याचं दिसत आहे.

मंत्रिमंडळ विस्तारानंतर तानाजी सावंत नाराज झाले आहेत. मंत्रिमंडळ विस्तारात तानाजी सावंत यांचं नाव नव्हतं त्यावेळेस ते मातोश्रीवर गेले होते. उद्धव ठाकरे आणि तानाजी सावंत यांच्यात खटके उडाले. त्यानंतर इतरही अनेक नेत्यांची नाराजी समोर आली. या सगळ्यानंतर काल(बुधवार दि 9 जानेवारी) झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत तानाजी सावंत यांचे नातेवाईक हे भाजपसोबत होते. यानंतर आज मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली होती तर या बैठकीलाही सावंतांनी दांडी मारली आहे. यातून त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

आगामी काळात जर तानाजी सावंतांची नाराजी अशीच राहिली तर हे शिवसेनेला परवडणारं नाहीये. कारण त्यांच्या रुपाने शिवसेनेला एक मोठं नेतृत्व मिळालं आहे. दुसरीकडे पक्षाचीही एक प्रतिमा आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना लवकरात लवकर यावर तोडगा काढावा लागणार आहे. कारण ही नाराजी महाविकासआघाडीसाठी नुकसानदायक ठरू शकते. नाराज नेत्यांची संख्या अशाने वाढत जाताना दिसेल. एकीकडे काँग्रेसचे मंत्री वडेट्टीवार नाराज आहेत, ज्यांना मंत्रिपदं नाहीत असे अनेक नेते नाराज आहेत, त्याचप्रमाणे तानाजी सावंतही नाराज आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंना लवकरात लवकर पाऊल टाकून यावर तोडगा काढणे गरजेचे आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/