रेल्वेच्या इतिहासातील पहिलचं प्रकरण, अपहरण झालेल्या मुलीला वाचविण्यासाठी विना थांबा तब्बल 240 KM रेल्वे धावली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय रेल्वेच्या इतिहासात अशी पहिली घटना समोर आली आहे, जेथे अपहरण झालेल्या मुलीला वाचवण्यासाठी रेल्वेने कोणत्याही स्टेशनवर न थांबता 240 किलोमीटर अंतरापर्यंत ट्रेन चालविली आणि शेवटी त्या मुलीला सुखरूप ताब्यात घेतले. एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखी दिसणारी ही घटना प्रत्यक्षात घडली आहे. उत्तर प्रदेशातील ललितपूर ते मध्य प्रदेशची राजधानी भोपाळपर्यंत रेल्वेने जवळपास 240 किलोमीटर अंतरापर्यंत एका ट्रेनला कुठल्याही स्टेशनवर न थांबवता मुलीला सुखरूप ताब्यात घेतले.

ललितपूर येथील एका महिलेने आरपीएफला सांगितले की एक व्यक्ती तिच्या मुलीला जबरदस्तीने आपल्यासोबत घेऊन गेला आहे. ज्याला तिने ट्रेनमध्ये चढताना पाहिले आहे. माहिती मिळताच ललितपूर स्टेशनचे सीसीटीव्ही फुटेज पाहण्यात आले, ज्यामध्ये महिलेने मुलीची ओळख पटविली. फुटेजच्या आधारे असे आढळले की मुलीला घेऊन जाणारा तो व्यक्ती राप्तीसागर एक्स्प्रेसमध्ये चढला आहे.

त्यानंतर लवकरच निर्णय घेण्यात आला की भोपाळपर्यंत ट्रेनला न थांबवता जाऊ द्यावे. याबाबतची माहिती त्वरित भोपाळ आरपीएफला पाठविली गेली. दरम्यान, येणाऱ्या कोणत्याही स्थानकात रेल्वे थांबविण्यात आली नव्हती. ही ट्रेन भोपाळला पोहोचणार होती तेव्हा आरपीएफ आणि जीआरपीने घेराव घातला. प्लॅटफॉर्मच्या दोन्ही बाजूंनी जवान उभे करण्यात आले आणि ट्रेन थांबताच सर्व जवानांनी ट्रेनच्या कोचच्या आत धाव घेतली. यानंतर ट्रेनची तपासणी सुरू झाली तेव्हा कोच नंबर S2 मध्ये जवानांना सांगण्यात आलेला तो माणूस गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केलेल्या एका मुलीसोबत बसलेला आढळला.

तपासणी दरम्यान उघडकीस आले असे काही
यानंतर आरपीएफने त्या व्यक्तीला आणि मुलीला ट्रेनमधून खाली आणले आणि जीआरपीच्या स्वाधीन केले. पकडलेल्या व्यक्तीने सांगितले की तो उत्तर प्रदेशातील ललितपूरचा रहिवासी असून ही मुलगी त्याची स्वतःची मुलगी आहे. पत्नीशी झालेल्या वादामुळे तो आपल्या मुलीसह ट्रेनमध्ये बसल्याचे तपासात उघड झाले. मात्र त्यानंतर ललितपूरला पोहोचताच पती-पत्नीमध्ये समेट करून देण्यात आला. त्याचबरोबर भारतीय रेल्वेच्या इतिहासातील हे पहिलेच असे प्रकरण आहे, ज्यात एका ट्रेनला न थांबता इतक्या अंतरापर्यंत मुलीला सुरक्षितपणे परत आणण्यासाठी चालविण्यात आले.