खासदार उदयनराजे भोसले कडाडले, म्हणाले – ‘पुतळ्याला हात लावाल तर गाठ माझ्याशी’

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन –  पुणे- बंगळूरू महामार्गावरील छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा आणि सातारा राजधानी सेल्फी पॉइंटला कोण हात लावायचा प्रयत्न केला तर त्याची माझ्याशी गाठ आहे. पुतळ्याला नुसता स्पर्श केला तरी त्याला किंमत मोजावी लागेल. खबरदार स्वतः मी अश्वारुढ पुतळ्याच्या ठिकाणी उभा राहतो, बघू या त्या पुतळ्याच्या जवळ यायची कोणाची हिम्मत आहे, असा इशारा खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे 13 वे वंशज उदयनराजे भोसले यांनी रस्ते विकास महामंडळाच्या अतिक्रमण विभागाला दिला आहे.

पुणे – बंगळूर महामार्गावरील खंबाटकी वेले येथे विराजमान असेलला छत्रपती शिवाजी महाराजांचा 50 फुटी पुतळा राष्ट्रीय महामार्ग अतिक्रमण पथकाने शुक्रवारी (दि. 26) हटवण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी शिवभक्तांनी तीव्र विरोध करुन रस्ते विकास महामंडळाच्या अधिका-यांचा प्रयत्न हाणून पाडला. या प्रकरणावर खासदार उदयनराजे भोसले यांनी कडक प्रतिक्रिया दिली. राष्ट्रीय महामार्ग अतिक्रमण पथकाने पुतळ्याच्या जवळील बांधकामांवर बुलडोझर फिरवला. याच दरम्यान हे पथक महारांजाच्या पुतळ्याजवळ येताच स्थानिक शिवभक्तांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला दंडवत टाकत प्रशासनाला खबरदार पुतळ्याला हात लावला तर रक्ताचे पाट वाहतील असा इशारा दिला.