खासदार वरूण गांधींनी दिलेला ‘शब्द’ पाळला ; ९ वर्षातला संपूर्ण पगाराचा उपयोग जन ‘हिता’साठी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अनेक राजकीय नेते तसेच मंत्री गरजू लोकांची मदत करताना आपल्याला दिसत असतात. त्याचप्रमाणे मदत करण्याचे देखील आवाहन करत असतात, मात्र दिलेला शब्द पाळणारे खूप कमी जण असतात. मात्र भाजपचे खासदार वरूण गांधी याला अपवाद आहेत, ते आपला दिलेला शब्द पूर्ण करतातच. त्यांनी खासदार म्हणून मिळणारा त्यांचा संपूर्ण पगार गरीब आणि गरजू लोकांना वाटला आहे. मागील ९ वर्षांपासून त्यांना खासदार म्हणून मिळणारा पगार त्यांनी वाटला आहे.

वरूण गांधी हे उत्तर प्रदेशमधील सुलतानपूर मधून खासदार म्हणून निवडून आले आहेत. खासदारांच्या पगार वाढीचे विधेयक ज्यावेळी संसदेत मांडण्यात आले, त्यावेळी त्यांनी त्याला विरोध केला. वरूण गांधी आपल्या पगारातील एक रुपयाही स्वतःसाठी वापरत नाहीत.

दरम्यान, या वर्षी खासदारांनी त्यांना मिळणारा पगार स्वतः न घेता त्यांनी तो पगार गरजू आणि गरीब लोकांना द्यावा अशी मागणी करण्यात आली होती. त्यावेळी लोकसभा अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात वरुण गांधीनी म्हटले होते कि, ‘भारतात आर्थिक असमानता दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील एक टक्का श्रीमंत लोकांकडे देशाच्या एकूण संपत्ती पैकी ६० टक्के मालकी आहे. देशातील ८४ अब्जोपतींकडे देशातील ७० टक्के संपत्ती आहे. हे आपल्या लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक आहे’. त्याचवेळी आपण राजकारणात पैसे कमावण्यासाठी नाही तर लोकांची सेवा करण्यासाठी आपण आलो असल्याचे देखील ते दरवेळी सांगतात. वरुण गांधी हे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे चुलत भाऊ असून इंदिरा गांधींचे नातू आहेत.