मध्य प्रदेशच्या विधानसभा अध्यक्षांची ‘त्या’ 9 आमदारांना नोटीस

भोपाळ : वृत्तसंस्था – मध्य प्रदेश विधानसभा अध्यक्ष एन. पी. प्रजापती यांनी काँग्रेसच्या ९ आमदारांना नोटीस पाठविली असून त्यांना १५ मार्च रोजी आपल्यासमोर येऊन म्हणणे मांडण्यास सांगितले आहे.
काँग्रेसचे २२ आमदारांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. सध्या ते बंगळुरु येथे आहेत. या आमदारांपैकी १३ आमदारांना अगोदरच अध्यक्षांनी नोटीस पाठविली आहे. त्यांना वेगवेगळ्या तारखांना उपस्थित राहण्यास सांगितले आहे. जे विधायक आतापर्यंत उपस्थित राहिलेले नाहीत, त्यांना शनिवार आणि रविवारी समक्ष येऊन उपस्थित राहण्यासाठी दुसर्‍यांदा वेळ देण्यात आली आहे.

ज्योतिरादित्य सिंधिया गटाच्या २२ आमदारांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन आमदारकीचाही राजीनामा अध्यक्षांकडे पाठविला आहे. त्यांचा राजीनामा मंजूर करण्यापूर्वी त्यांनी हा राजीनामा कोणाच्या दबावाखाली दिलेला नाही ना हे जाणीव घेण्यासाठी अध्यक्ष त्यांना प्रत्यक्ष उपस्थित राहण्यास सांगून त्याची सुनावणी घेतली जाते. त्यासाठी एन. पी. प्रजापती यांनी सर्वांना नोटीस पाठविली आहे.

कर्नाटकातील आमदारांनी काँग्रेस पक्षाचा आणि आमदारपदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी कर्नाटक विधानसभेच्या अध्यक्षांनी त्यांचा राजीनामा फेटाळून त्यांच्याविरुद्ध लोकप्रतिनिधी कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांचे आमदारपद रद्द करुन त्यांना ६ वर्षे निवडणुक लढविण्यास बंदी घातली होती. त्याविरुद्ध या आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. तेव्हा त्यांचे आमदारपदाबाबतचा अध्यक्षांचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने मान्य केला होता. मात्र, त्यांना निवडणुक लढविण्यास बंदी चा निर्णय रद्द करुन त्यांना निवडणुक लढविण्यास मुभा दिली होती. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत प्रामुख्याने हेच आमदार भाजपाच्या तिकीटावर पुन्हा निवडून आले होते. त्यामुळे मध्य प्रदेश विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेतात, यावर कमलनाथ सरकारचे भवितव्य अवलंबून असणार आहे.