‘पावसाळा संपला तरी बेडकांची डराव-डराव संपली नाही’

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाइन – दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackery) यांनी नारायण राणे यांच्यावर टीका केल्यानंतर आता शिवसेना ( Shivsena) आणि नारायण राणे ( Narayan Rane ) यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. उद्धव ठाकरे यांनी टीकाकेल्यानंतर नारायण राणे यांनी त्यांच्यावर टीका केली होती. त्यावर आता पावसाळा संपला तरी बेडकांची डराव – डराव संपली नाही, अशा शब्दात शिवसेना खासदार विनायक राऊत ( Vinayak Raut) यांनी नारायण राणेंवर टीकास्त्र सोडलं. नारायण राणेंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवर बोलताना, ‘येत्या काळात जनता राणेंना त्यांची जागा दाखवून देईन’, असं विनायक राऊत म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांच्यावर टीका केल्यानंतर नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह संजय राऊत ( Sanjay Raut) यांच्यावरही घणाघाती हल्ला चढवला. राणे कुटुंबाच्या वाटेला जाऊ नका नाहीतर मातोश्रीच्या आत-बाहेर काय चालतं हे सगळं बाहेर काढीन आणि ते तुम्हाला जड जाईन, असा इशारा त्यांनी उद्धव ठाकरे यांना दिला होता. त्याचबरोबर उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत महाराष्ट्रातील आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वांत बुद्धू मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचा उल्लेख केला तसंच उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्रीपदावर बसण्याची लायकी नाही, असं राणे म्हणाले.

यावर बोलताना राऊत म्हणाले, “नारायण राणे तुम्हाला माझा एकच सल्ला आहे, तुम्ही मुख्यमंत्री होतात. मुख्यमंत्रीपदावर असलेल्या व्यक्तीला तुम्ही उद्देशून वापरलेले शब्द न शोभणारे आहेत”. त्याचबरोबर पावसाळा संपला असला तरी या बेडकांची डरावडराव गिरी संपलेली नाही. पण त्यांच्या डराव-डराव गिरीला कोणी घाबरत नाही. येत्या काही काळात जनता राणेंना त्यांची जागा दाखवून देईन” असे देखील विनायक राऊत यांनी म्हटले. दरम्यान, दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राणे पिता पुत्रांवर तोफ डागली तसंच त्यांना बेडकाची उपमा दिली होती. त्यानंतर नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना पुळचट मुख्यमंत्री म्हणून टोला हाणला होता.