MPSC नं जाहीर केली नवीन गुणपद्धती, जाणून घ्या काय केला बदल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गुण पद्धतीमध्ये बदल केला असून नवीन गुणपद्धती जाहीर केली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेतल्या जाणाऱ्या विविध वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षांकरिता चार चुकीच्या उत्तरांबद्दल एक गुण वजा करण्याबाबतचा नकारात्मकता गुणांची पद्धती होती. त्यामध्ये आता बदल करण्यात आला आहे.

MPSC ने लागू केलेल्या 2009 च्या नकारात्मकता पद्धतीत बदल केला आहे. यापूर्वी प्रत्येक चुकीच्या उत्तरा करिता 1/3 एवढे गुण वजा केले जात होते. आता नवीन नियमानुसार प्रत्येक चुकीच्या उत्तरा करिता 25 टक्के किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येणार आहेत. एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास अशा प्रश्नाचे उत्तर चुकीचे समजण्यात येऊन त्या प्रश्नाच्या उत्तरांमधून 25 टक्के किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येणार आहेत. हा नियम लागू करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तरी ती अपूर्णांकातच राहील. याशिवाय एखाद्या प्रश्नाचे उत्तरे अनुत्तरित असेल तर नकारात्मकता गुणांची पद्धती लागू होणार नाही.

MPSC ने जाहीर केलेली नवीन गुणांची पद्धत सर्व स्पर्धा परीक्षा, मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा तसेच चाळणी परीक्षांकरिता लागू असणार आहे, अशी घोषणा MPSC च्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे.