MPSC परीक्षेवरून आंदोलन : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह 9 जणांना अटक; सकाळी सुटका (व्हिडिओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – एमपीएससीची नियोजित परीक्षा अचानक पुढे ढकल्याने पुण्यात लालबहादूर शास्त्री रस्त्यावर आंदोलन प्रकरणात पुणे पोलिसांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर व 9 जणांना अटक केली. त्यानंतर त्यांची रात्री उशिरा सुटका देखील केली. आंदोलन प्रकरणात 25 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमपीएससीची परीक्षा रविवारी होणार होती. पण राज्य सरकारने अचानक काल परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. यामुळे गोंधळलेल्या हजारो विद्यार्थ्यांनी गुरुवारी आंदोलन केले. लालबहादूर शास्त्री रस्त्यावर एक-एक करत हजारो विद्यार्थी जमले. दुपारी सुरू झालेले हे आंदोलन शेवटी रात्री पोलिसांना धरपकड करत मोडून काढावे लागले. पण आंदोलनाने शहर दणाणून गेले होते. या आंदोलनाला भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पाठिंबा देत सहभाग घेतला होता. आठ तास संपूर्ण लाल बहादूर शास्त्री रस्ता या आंदोलकांनी रोखून धरला होता. त्यानंतर रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी बळाचा वापर करून हे आंदोलन मोडून काढले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी गुन्हा दाखल करत गोपीचंद पडळकर यांच्यासह 9 जणांना अटक केली. तसेच उशिरा त्यांना जामीन देत सुटका देखील केली.