विजय वडेट्टीवारांच्या खात्याने घेतला MPSC चा निर्णय; मात्र मंत्र्यांनाच माहिती नाही, मग कोणी घेतला निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   तीन दिवसांवर परीक्षा आली असताना MPSC ने अचानक आज परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. सरकारने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्यानंतर संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यास सुरुवात केली. आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पुण्यात सुरू झालेल्या आंदोलनाचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटत आहेत. विरोधकांनी सरकारच्या या निर्णयावर टीका केली. मात्र, महाविकास आघाडी सरकारमधील मित्र पक्ष असलेल्या काँग्रेसने सरकारच्या या निर्णया विरोधात निदर्शने केली. त्यामुळे हा निर्णय नेमका कोणी घेतला, असा प्रश्न विचारला जात आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या नेतृत्वाखाली MPSC च्या कर्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली. यावेळी ठरलेल्या दिवशी 14 मार्चला परीक्षा घ्यावी, अशी मागणी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. यावेळी निदर्शने करणाऱ्या प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे, चिटणीस अ‍ॅड. विवेक गावंडे, अमित जाधव, जितेंद्र यादव यांच्यासह इतर कर्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

राज्य सरकारने MPSC परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, सत्यजित तांबे यांच्यासह मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सरकारने या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी केली. या सर्व घडामोडीनंतर MPSC ने स्पष्टीकरण दिले आहे. सरकारने पाठवलेल्या लेखी पत्राची अंमलबाजवणी करत हे परिपत्रक काढल्याचे सांगितले. हा निर्णय आपत्ती निवारण विभागाने दिला असून, त्याला मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिल्याचे म्हटले आहे.

MPSC च्या स्पष्टीकरणानंतर, राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी करणारे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याच खात्याने हे पत्र पाठवल्याचे सांगण्यात आले. मात्र, आपल्याच खात्याने पत्र पाठवल्याचे वडेट्टीवार यांना माहिती नाही. आणि तेच या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी करणारा व्हिडिओ पोस्ट करत आहेत. त्यामुळे ठाकरे सरकारचा सावळा गोंधळ समोर आला आहे. मात्र, या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.

मला अंधारात ठेऊन घेतलेला निर्णय

आपल्याच खात्याने हा निर्णय घेतल्याचे समोर आल्यानंतर खात्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले की, याबाबत माझ्या विभागाने मला न विचारता सचिव स्तरावरून परस्पर निर्णय घेतला आहे. मला याबाबत काहीही माहिती नाही, मला अंधारात ठेवून हा निर्णय घेण्यात आला असून, याबाबत चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन वडेट्टीवार यांनी दिले आहे.