Coronavirus : पुणे-मुंबईतील परीक्षा केंद्रावरून विद्यार्थ्यांसमोर नवा पेच

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षा जवळ आल्या आहेत. मात्र, परीक्षा केंद्र पुणे आणि मुंबई या ठिकाणी असल्याने आणि या ठिकाणी कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच या ठिकाणी जाण्यासाठी वाहतुकीची कोणतीही सुविधा नाही. मग परीक्षा केंद्रावर पोहोचायचं तर कसं ? असा पेच विद्यार्थ्यांसमोर आहे. त्यामुळे राज्यातील इतर जिल्ह्यातून विद्यार्थ्यांनी परीक्षेला येण्यासाठी आता विरोध दर्शवला आहे.

परीक्षा केंद्र हे स्व जिल्ह्यात उपलब्ध करून देण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे. या परीक्षेला मराठवाड्यातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात बसले आहेत. विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी मुंबई-पुणे या ठिकाणी जातात. या ठिकाणी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे विद्यार्थी आपापल्या गावी परतले आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांसमोर नवीन पेच निर्माण झाला आहे. परीक्षा देता येते की नाही अशी चिंता त्यांना सतावत आहे.

राज्य सेवेच्या परीक्षा जवळ आल्या आहेत. मात्र, परीक्षा केंद्रावर कसं जाणार, हा मोठा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उभा ठाकला आहे. पुण्यामध्ये इतर जिल्ह्यांतून तयारी करण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी पुणे केंद्र निवडले आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे राज्यातील बस सेवा बंद आहे. आता पुण्याला जायचं तरी कसं हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. यातून काहीतरी मार्ग काढावा, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्र बीड जिल्ह्यातच उपलब्ध करुन देण्याची मागणी केली आहे.