MPSC ची याच वर्षी होणार परीक्षा ? केंद्रांचा घेतला जातोय आढावा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) 26 मार्चला होणारी राज्य सेवेची पूर्व परीक्षा करोनामुळे रद्द करावी लागली. मात्र, आता युपीएससीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर आता परीक्षा केंद्रांची उपलब्धता आणि केंद्र व राज्य शासनाच्या अन्य विभागांच्या परीक्षांच्या तारखांचा आढावा घेऊन वेळापत्रक निश्चित करण्याच्या तयारीला वेग आला आहे. डिसेंबरपर्यंत राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा होतील आणि काही दिवसांत वेळापत्रकही जाहीर होईल, असं एमपीएससीच्या प्रभारी उपसचिव गीता कुलकर्णी यांनी सांगितले.

राज्य सेवेची पूर्व परीक्षा आणि पोलीस उपनिरीक्षक व मंत्रालयीन सहायक या पदांची परीक्षा घेण्याचे वेळापत्रक एमपीएससीकडून निश्चित केले जात आहे. दरम्यान, बहूतांश विद्यार्थी युपीएससी, एमपीएससीसह राज्य शासनाच्या विविध परीक्षांची तयारी करीत असतात. त्यामुळे त्या परीक्षांच्या तारखा सोडून परीक्षा कोणत्यावेळी घेणे विद्यार्थ्यांसह एमपीएससीला सोयीस्कर होईल हे पाहिलं जाईल.

पुरेशा प्रमाणात परीक्षक उपलब्ध होतील का, याचे नियोजन सुरु झाले आहे. तर दुसरीकडे जिल्हाबंदीचा परीक्षांवर काही परिणाम होईल का, याचीही स्थिती जाणून घेतली जात आहे. मात्र, डिसेंबरपर्यंत निश्चितपणे एमपीएससीची परीक्षा घेतली जाईल, असा विश्वासही उपसचिव कुलकर्णी यांन यावेळी व्यक्त केला.
राज्यातील दोन लाखांहून अधिक विद्यार्थी स्पर्धा परिक्षेची तयारी करीत आहेत. कोरोनामुळे दोनदा वेळापत्रक रद्द करावे लागले. तरीही आता युपीएससीचे वेळापत्रक जाहीर झाले असून आणखी केंद्र व राज्य सरकारच्या अन्य कोणत्या विभागांच्या परीक्षा आहेत का, याचा आढावा घेतला जात आहे. त्यानुसार आता एमपीएससीच्या परीक्षांचे वेळापत्रक निश्चित होईल, असे एमपीएससी मुंबई प्रभारी उपसचिव गीता कुलकर्णी यांनी सांगितले.