MPSC मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर, प्रसाद चौगुले राज्यात पहिला तर पर्वणी पाटील मुलींमध्ये पहिली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेमध्ये साताऱ्याचा प्रसाद चौगुले हा सर्वसाधारण वर्गातून राज्यात पहिला आला आहे. महिला वर्गवारीतून अमरावती जिल्ह्यातील पर्वती पाटील पहिली आली आहे. तर उस्मानाबाद जिल्ह्यातील रवींद्र शेळके हा विद्यार्थी मागासवर्गीयांमधून पहिला आला आहे. एमपीएसीच्या माध्यमातून १३ ते १५ जुलै २०१९ दरम्यान राज्य सेवा मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. उमेदवारांच्या माहितीसाठी हा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला आहे.

राज्य सेवा (पूर्व) परीक्षा १७ फेब्रुवारी २०१९ रोजी मुंबईसह अन्य ३७ केंद्रावर घेण्यात आली होती. या परीक्षेच्या पूर्व परीक्षेकरता ३ लाख ६० हजार ९९० उमेदवारांना प्रवेश देण्यात आला होता. या परीक्षेतून ६ हजार ८२५ पात्र ठरले होते. याची मुख्य परीक्षा १३ ते १५ जुलै २०१९ रोजी मुंबई, औरंगाबाद, नागपूर, आणि पुणे येथे घेण्यात आली होती. त्याचा निकाल आज प्रसिद्ध करण्यात आला.

मुख्य परीक्षेसाठी ६ हजार ८२५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातून १ हजार ३२६ विद्यार्थी हे मुलाखतीसाठी निवडण्यात आले. आता त्यातल्या ४२० जणांची अधिकारी म्हणून निवड करण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना पुर्नमूल्यांकनाचा अर्ज करायचा आहे त्यांनी निकालानंतर १० दिवसांच्या आत ऑनलाइन फॉर्म भरावा, असं आवाहन आयोगानं केलं आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवरती निकाल केव्हा लागेल याबाबत मुलांच्या मनात साशंकता होती. निकाल लागल्याने हजारो विद्यार्थ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.