‘नीट’मुळे MPSC ची ‘राज्यसेवा’ परीक्षा ढकलली पुढे !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –  देशात ‘नीट’ परीक्षा 13 सप्टेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात ‘एमपीएससी’ने 13 सप्टेंबर रोजी होणारी ‘राज्यसेवा’ परीक्षा पुढे ढकलली आहे. याबाबतचा निर्णय ‘एमपीएससी’ने घेऊन पत्रकाद्वारे अधिकृतरित्या हे जाहीर केले आहे. त्यामुळे आता स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांना आणखी अभ्यास करण्यासाठी वेळ मिळणार आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे ‘एमपीएससी’ अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तिसर्‍यांदा परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलाय. या अगोदर स्थगित करण्यात आलेल्या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक 17 जूनला जाहीर केले होते. 17 जून च्या वेळापत्रकानुसार राज्यसेवा पूर्व परीक्षा 13 सप्टेंबर, दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 11 ऑक्टोबर आणि अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 1 नोव्हेंबर होणार होत्या.

मात्र, 13 सप्टेंबर रोजी देशभरात ‘नीट’ परीक्षा होणार आहे. त्याच दिवशी राज्य सेवा पूर्व परीक्षा देखील होणार होती. मात्र, आता ‘नीट’मुळे ‘एमपीएससी’ने पुन्हा एकदा ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलाय. ‘एमपीएससी’ने 23 डिसेंबर 2019 रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहीरातीनुसार, राज्य सेवा पूर्व परीक्षा-2020 रविवार, 5 एप्रिल 2020 रोजी घेण्याचे निश्चित केलं होतं. मात्र, करोनाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा ऐनवेळी पुढे ढकलली होती. त्यामुळे 17 जून 2020 रोजी पुन्हा ‘एमपीएससी’ने प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही परीक्षा 13 सप्टेंबर रोजी होणार असे घोषीत केले होते. या आयोगाकडून परीक्षेचा दिनांक देखील निश्चित केला. त्यानंतर राष्ट्रीय परीक्षा संस्थेकडून 3 जुलै 2020 रोजीच्या सूचनेद्वारे राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा (नीट) 13 सप्टेंबर 2020 रोजी घेण्याचे निश्चित झाले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित परीक्षेकरीता उमेदवारांची संख्या तसेच राष्ट्रीय परीक्षा संस्थेकडून घेण्यात येणार्‍या परीक्षेसाठी प्रवेश देण्यात येणार्‍या उमेदवारांची संख्या लक्षात घेता दोन्ही परीक्षांचे एकाच दिवशी आयोजन करण्यास परीक्षा उपकेंद्राच्या उपलब्धतेसह अन्य प्रशासकीय अडचणी निर्माण होत आहेत, अशी बाब निदर्शनास आली. राष्ट्रीय परीक्षा संस्थेकडून घेण्यात येणारी परीक्षा ही देश पातळीवर घेण्यात येते, ही बाब लक्षात घेऊन प्रशासकीय कारणामुळे ‘एमपीएससी’ने आयोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा 20 सप्टेंबर रोजी घेण्याचे निश्चित केल्याचे ‘एमपीएससी’ अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने तसेच उमेदवार आणि परीक्षा आयोजनातील सर्व कर्मचार्‍यांच्या सुरक्षेसाठी आयोगाकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत, असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अर्थात ‘एमपीएसी’ने कळवले आहे.