MPSC पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर, सर्वाधिक पुण्यातील उमेदवारांची बाजी 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून ((एमपीएससी) राज्यसेवा पूर्व परीक्षेचा निकाल गुरुवार जाहीर करण्यात आला. या परीक्षेत उत्तीर्ण होऊन जवळपास राज्यभरातील ७ हजार ४० उमेदवार मुख्य परीक्षेकरिता पात्र ठरले आहेत. यात पुण्यातील सर्वाधिक २ हजार ४९५उमेदवार मुख्य परीक्षेकरिता निवडण्यात आले आहेत.

ही परीक्षा आयोगाकडून फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आली होती. या परीक्षेच्या निकलासह कट ऑफ यादी देखील संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीनुसार एसईबीसी आणि ओबीसी गटात सर्वसाधारण जागांसाठी १९८, महिलांसाठी १८०, खेळाडूंसाठी १४३ आणि अनाथांसाठी १४० कट ऑफ आहे.

पुण्याचे सर्वाधिक उमेदवार

निवड झालेल्यांत पुणे (२ हजार ४९५), मुंबई (४१८), नगर (३९९), औरंगाबाद (३१२), जळगाव (१२२), कोल्हापूर (३८५), लातूर (१५९), नागपूर (१९९), नांदेड (१५१), नाशिक (३५२), नवी मुंबई (१८२) आदी जिल्ह्य़ातील उमेदवार आहेत. मुख्य परीक्षा १३ ते १५ जुलै दरम्यान होणार आहे.

गट अ आणि ब पदांसाठी निश्चित केलेली क्रीडाविषयक अर्हता धारण करत असल्याबाबतचे प्रमाणपत्र उमेदवारांनी सादर करणे बंधनकारक आहे. तसेच अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकापूर्वीची क्रीडा आणि युवक सेवा संचालनालयाच्या उपसंचालकांकडे प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज सादर करणे, त्याची पोचपावती, मुलाखतीवेळी प्रमाणपत्र पडताळणी अहवाल सादर करणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.