एबी डिव्हिलियर्स संदर्भातील ‘त्या’ चर्चांना पूर्णविराम, क्रिकेट दक्षिण आफ्रिकेचा खुलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  आपल्या वादळी बँटिंगने चाहत्यांची मनं जिंकणाऱ्या एबी डिव्हिलियर्सने त्यांनाच मोठा धक्का दिला आहे. आयपीएलसह इतर ट्वेंटी-20 लीग गाजवणारा एबी डिव्हिलियर्स पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक करुन आगामी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधित्व करणार अशी चर्चा होती. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेचे प्रमुख व माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथ, मुख्य प्रशिक्षक व माजी यष्टिरक्षक मार्क बाऊचर यांनी तसे संकेत दिले होते. तसेच त्याच्यासोबत चर्चा सुरु असल्याचे सांगितले होते. मात्र, आता क्रिकेट दक्षिण आफ्रिकेनं मोठा खुलासा केला आहे.

एबी डिव्हिलियर्सनं मे 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. जानेवारी 2020 मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. दक्षिण आफ्रिकेचा संघही 2021 च्या ट्वेंटी-20 वर्ल्डकपसाठी त्याच्या नावाचा विचार करत होती. अशीच चर्चा 2019 च्या वन डे वर्ल्डकप स्पर्धेदरम्यानही झाली होती. मात्र, मंगळवारी (दि.18) क्रिकेट दक्षिण आफ्रिकेनं या सर्व चर्चांना पूर्णविराम लावला आहे.

एबी डिव्हिलियर्सने निवृत्तीचा घेतलेला निर्णय मागे घेण्यास स्पष्ट नकार दिल्याचे क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने सांगितले. त्यामुळे एबी डिव्हिलियर्सच्या आंतरराष्ट्रीय पुनरागमनाला आता कायमचा पूर्णविराम लागला आहे. त्यामुळे वेस्ट इंडिज दौऱ्यासाठीच्या टीममध्ये त्याची निवड झाली नाही, असंही बोर्डाने सांगितले. दक्षिण आफ्रिकेची टीम वेस्ट इंडिजमध्ये 2 टेस्ट आणि 5 टी-20 मॅचची सीरीज खेळणार आहे. 10 जूनपासून या दौऱ्याला सुरुवात होणार आहे.

एबी डिव्हिलियर्सने 114 टेस्ट 228 वनडे आणि 78 टी-20 आंतरराष्ट्रीय मॅच खेळल्या. यामध्ये त्याने 47 शतके केली. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी आयपीएलमध्ये मात्र त्याने धमका केला. यावर्षी 6 इनिंगमध्ये त्याने 51.75 च्या सरासरीने 207 रन केल्या आहेत.