राज्यपाल महोदय, ऑनलाईन परीक्षांचा ‘हट्ट’ सोडा अन् विद्यार्थ्यांचा ‘छळ’ थांबवा !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाच्या पाश्वर्भूमीवर होणा-या ऑनलाईन परीक्षांचा हट्ट सोडावा, यातून विद्यार्थ्यांचा होणारा मानसिक छळ थांबवा, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसने केली आहे. याबाबत प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना निवेदन दिले आहे. विविध विद्यापीठात ऑनलाईन परीक्षाबाबत येणा-या अडचणीच्या माहितीचे निवेदनही त्यांनी यावेळी राज्यपालांना दिले आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने दिलेली लिंक ओपन करण्यासाठी विलंब लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेला वेळ कमी पडत आहे. प्रश्नपत्रिकेत अर्धे्च प्रश्न दिसत होते. तर अर्ध्या प्रश्नाचे फक्त उत्तर दिसत होते. काही विद्यार्थ्यांची प्रश्नपत्रिका ऑटोमॅटीक सबमिट होत होती. तसेच विद्यापीठाने हेल्पलाईन म्हणून दिलेल्या क्रमांकावर एकदाही फोन घेण्यात आला नसल्याचे पत्रात म्हटले आहे. पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातही असाच गोंधळ उडाला आहे. वेळोवेळी विद्यापीठाची साईट क्रॅश होते. वेबसाईटमध्ये अडचणी आल्याने परीक्षा वेळेवर सुरु होत नाहीत. विद्यार्थ्यांना ताटकळत बसावे लागते. परीक्षार्थी विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याने विद्यापीठाची हेल्पलाईन सतत व्यस्त लागत आहे.

नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाने पेपर पाठवताना वेळेचे योग्य नियोजन केले नाही. वेळापत्राकात नमूद वेळेनुसार पेपर येत नाही. पेपर सबमनीट करताना वेळेत सबमीट होत नाही. अमरावती येथील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, तसेच कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाबाबतही अशाच तक्रारी असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.