नगर मनपानं खरेदी केलेले MRI मशीन चक्क भाजीमंडईत !

पोलिसनामा ऑनलाईन – नगरच्या महानगरपालिकेने सुमारे साडेतीन कोटी रुपये खर्चून खरेदी केलेले ‘एमआरआय’ मशीन गेल्या सहा महिन्यांपासून चक्क सावेडीतील भाजीमंडईच्या आवारात उघडयावर वापराविना पडून असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी मशीनचा शोध लावला.

शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी लक्ष वेधले आहे. कोरोना काळात नगरकरांपुढे बडेजाव मिरवणार्‍या महापौर व आयुक्तांचे करायचे काय, असा संतप्त सवाल त्यांनी विचारला आहे. मनपाने नगरकरांना महागडी एमआरआयची सुविधा अल्पदरात उपलब्ध व्हावी यासाठी हे मशीन खरेदी केले. त्यासाठी नियोजन मंडळाकडून साडेतीन कोटी रुपयांचा निधी मिळाला. नगरकरांना आरोग्य सुविधा कमी पैशात मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु सहा महिन्यापूर्वी खरेदी केलेले मशीन जागेअभावी कोठेच बसविण्यात आलेले नाही. मशीनचे साडेतीन कोटी रुपयांचे बिल मनपाने नुकतेच संबंधित पुरवठादार कंपनीला अदा केले. त्यानंतर हे मशीन कोठे बसवले याची विचारणा केली असात अधिकार्‍यांनी याची माहिती दिली नाही. नंतर शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी मशीनचा शोध घेतला असता त्यांना धक्काच बसला. उपचार न मिळाल्याने मृतांचा आकडा वाढतो आहे. अशा स्थितीत हे एमआरआय मशीन सावेडीतील सावित्रीबाई फुले भाजी मंडईच्या आवारात धूळ खात पडून आहे . पावसाच्या पाण्याने ते खराब होऊ नये म्हणून केवळ एक प्लॅस्टिक ताडपत्री त्यावर टाकलेली होती.