माजी कर्णधार MS धोनी हा तर क्रिकेटमधला ‘योगी’ : जवागल श्रीनाथ

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   भारतीय संघाला टी-20 विश्वचषक, वन-डे विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकवून देणारा यशस्वी कर्णधार अशी महेंद्रसिंह धोनीची ओळख संपूर्ण जगाला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2011 साली वानखेडे मैदानावर श्रीलंकेवर मात करत विश्वचषक जिंकला होता. तो शांत आणि संयमी स्वभावासाठी ओळखला जातो. त्याबद्दल बोलताना भारताचा माजी क्रिकेटपटू जवागल श्रीनाथ याने धोनी हा तर क्रिकेटमधला योगी असल्याचे म्हटले आहे.

महेंद्रसिंग धोनी हा क्रिकेटमधील योगी आहे. त्याची खेळाची समज ही अप्रतिम आहे. तो निकालाची चिंता न करता खेळ समजून घेतो. निरपेक्ष भावनेने तो खेळ खेळताना दिसतो. प्रत्येक विजयानंतर त्याची बोलण्याची पद्धत त्यांच्यातील साधेपणा अधोरेखित करते. त्याच्या नेतृत्वाखाली जिंकलेल्या स्पर्धांच्या ट्रॉफीसुद्धा तो इतर खेळाडूंच्या स्वाधीन करतो आणि स्वतः शांतपणे अलिप्त राहताना दिसतो, असे श्रीनाथ अश्विन सोबत लाईव्ह चॅट दरम्यान बोलताना म्हणाला आहे. खेळपट्टीवर घडत असलेल्या बाबी संघासाठी पोषक नसतील किंवा संघ संकटात असेल तर तो प्रकारे दडपण हाताळतो, तसे एखादा योगीच करू शकतो. अशा दाबावाच्या स्थितीतही तो खूप शांत आणि संयमी असतो हे त्याचे बलस्थान आहे, असेही श्रीनाथने सांगितले आहे. मैदानाबाहेर आल्यानंतर तुम्ही जितक्या लवकर खेळापासून स्वत:ला दूर ठेवू शकता, तेवढे तुमच्यासाठी ते चांगले असते, असेही त्याने नमूद केले.