काय सांगता ! होय, MS ‘धोनी’ तयार करतोय ‘पाणीपुरी’ ! (व्हिडिओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एम. एस. धोनी पुन्हा मैदानावर कधी दिसणार याची सर्वांना आतुरता आहे. गेल्या वर्षी आयसीसी वर्ल्डकपनंतर धोनीने एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. धोनी जरी मैदानात चर्चेत नसला तरी दुसऱ्या काही कारणाने तो चर्चेत असतोच. सध्या सोशल मीडियावर धोनीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

षटकार, चौकर मारणारे धोनीचे व्हायरल व्हिडिओ तुम्ही पाहिले आहेत परंतु आता व्हायरल होणार हा व्हिडिओ थोडा अनोखा आहे. कारण हा व्हिडिओ पाणीपुरीच्या गाडीवरील आहे. धोनी एका पाणीपुरीच्या गाडीवर चक्क पाणीपुरी तयार करतोय आणि त्याच्या मित्रांना खायला घालतोय. मालदीवमध्ये एका कार्यक्रमावेळी धोनीने तेथील पाणीपुरीच्या गाडीवर आपल्या मित्रांना स्वत:च्या हाताने पाणीपुरी खायला घालत आहे. धोनीने आरपी सिंह आणि पियुष चावला यांना पाणीपुरी खायला घातली. हे तिन्ही खेळाडू एका कार्यक्रमासाठी एकत्र आले होते.

धोनी पुन्हा मैदानात कधी उतरणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली, कर्णधार विराट कोहली, प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी देखील धोनीच्या कमबॅकबद्दल कोणतीही माहिती दिली नाही. ऑस्ट्रेलियात होणारा वर्ल्डकप धोनी खेळणार का यावर अद्याप प्रश्नचिन्ह आहे. परंतु तत्पुर्वी तो आयपीएलमध्ये कमबॅक करत चेन्नईचे नेतृत्व करताना दिसेल.

आयपीएलच्या ऑल स्टार मॅचमध्ये धोनी खेळताना दिसेल असे सांगितले जात आहे. जर असे झाले तर विराट कोहली, रोहित शर्मा हे दिग्गज खेळाडू पुन्हा एकदा धोनीच्या नेतृत्वात खेळताना दिसतील.