वर्ल्डकप २०१९ : धोनीच्या ग्लोव्हजवरील ‘ते’ चिन्ह ठरतंय वादाचा विषय ; ICC कडून चिन्ह काढण्याची सूचना

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – विश्वचकातील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी याने वापरलेल्या ग्लोव्हजवरील भारताच्या पॅरा आर्मीचे चिन्ह लक्षवेधी ठरले असून ते चर्चेचा विषय ठरले आहे. हे सन्मानचिन्ह काढण्याची सूचना आयसीसीने दिल्याने आता तो वादाचा विषय ठरु पहात आहे.

विश्वचषकाच्या सलामीच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात धोनीने आपल्या ग्लोव्हजवर आर्मीचे बलिदान असे देवनागरी लिपीत लिहिलेले सन्मानचिन्ह वापरले. टीव्ही कॅमेऱ्यांनी सामन्याच्या वेळी ते अचूकपणे टिपले. अनेकांनी त्याबद्दल ट्विट करुन धोनीचे अभिनंदन केले. मात्र, ही बाब आयसीसीला पटलेली नाही. त्यांनी धोनीला हे सन्मानचिन्ह काढण्यास सांगावे, अशी बीसीसीआयला विनंती केली आहे.

बलिदान सन्मानचिन्ह हे लष्कराच्या विशेष दलासाठीचं आहे. निमलष्करी दलेही त्यात येतात. धोनीला लष्कराने २०११ मध्ये मानद लेफ्टनंटचा किताब देऊन सन्मानित केले होते. पॅराशूट रेजिमेंटमध्ये असलेल्या धोनीने याबाबतचे प्रशिक्षण २०११ मध्ये पूर्ण केले आहे.

पोषाख आणि उपकरणांवर राजकीय किंवा धार्मिक गोष्टी असू नयेत, असे आयसीसीला वाटते. मात्र, धोनीचे हे सन्मानचिन्ह राजकीय किंवा धार्मिक बाबीमध्ये मोडत नाही. त्यामुळे आयसीसीची विनंती धोनी मान्य करणार का याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. हे सन्मानचिन्ह वापरण्यासाठी क्रिकेटप्रेमी धोनीचे समर्थन करत आहेत. त्यामुळे जर धोनीला हे चिन्ह काढण्यास भाग पाडले तर क्रिकेटप्रेमींचा रोष नक्कीच ओढविला जाण्याची शक्यता आहे.