धोनीच्या ‘त्या’ ‘बॅज’च्या वादावरून ICCवर बरसला ‘हा’ भाजप खासदार ; जाणून घ्या, आणखी कोण काय म्हणाले

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – महेंद्रसिंह धोनीच्या ग्लोव्हस प्रकरणी वादावर नवनिर्वाचित खासदार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांनी प्रतिक्रिया देत या वादात उडी घेतली आहे. याचबरोबर अनेक माजी खेळाडू आणि राजकीय नेत्यांनी देखील यासंदर्भात वक्तव्ये केली आहेत. गौतम गंभीर याने आयसीसीला खेळाडूंच्या कपड्यांवरील चिन्हे आणि इतर छोट्यामोठ्या गोष्टींमध्ये लक्ष देण्यापेक्षा खेळाकडे व्यवस्थितपणे लक्ष देण्याचा सल्ला दिला आहे.

काय म्हणाला गौतम गंभीर:

आयसीसी चे काम क्रिकेटमधील समस्या व्यवस्थित सोडविणे असून कोणी आपल्या कपड्यांवर कोणते चिन्ह लावले आहे इत्यादी लहानसहान गोष्टींमध्ये लक्ष पुरविणे हे नाही. चिन्हाच्या मुद्द्याला अनावश्यकपणे महत्त्व दिले जात असून आयसीसी ने आपल्या कामाकडे लक्ष द्यावे. याबरोबरच त्यांनी सांगितले कि आयसीसी ने केवळ फलंदाजांना अनुकूल खेळपट्ट्या न बनविता गोलंदाजांना देखील अनुकूल परिस्थिती पुरविण्याकडे लक्ष दिले पाहिजे.

सेहवागने देखील दिली प्रतिक्रिया:

या संदर्भात सेहवाग म्हणाला कि ‘मी तर आयुष्यभर हनुमानाचे लॉकेट गळ्यात घालून क्रिकेट खेळलो पण मला कोणीच काही बोलले नाही. सचिनने देखील नेहमीच क्रिकेट खेळताना साईबाबांचे लॉकेट घातले आहे पण त्याविषयीदेखील कोणीच तक्रार केली नाही कारण हा प्रत्येकाच्या वैयक्तिक श्रद्धेचा भाग आहे आणि त्यानुसार प्रत्येकजण वागू शकतो.
याबाबत धोनीला सल्ला देताना त्याने सांगितले कि धोनीने बॅज लावण्यासाठी याबाबतीत आयसीसी कडून लेखी परवानगी घ्यावी. त्यानंतर आयसीसी आपल्या नियमांनुसार सांगेल त्याप्रमाणे धोनीला ग्लोव्हस, बॅट किंवा इतर ठिकाणी वापर करावा. मला नाही वाटत कि आयसीसीने याबाबतीत वादविवाद वाढवीला आहे.

मिल्खा सिंग काय म्हणाले :

मला नाही वाटत कि धोनीने यासंदर्भात काही चुकीचे केले आहे कारण भारतीय सेनेने धोनीला लेफ्टनंट कर्नलचा दर्जा देऊन सन्मान दिला आहे साहजिकपणे धोनीने सेनेबद्दल आदर व्यक्त करताना हा बॅज लावून सेनेबद्दल अभिमान व्यक्त केला आहे.

माजी क्रिकेटर कपिलदेव यांची प्रतिक्रिया :

मला वाटते कि आयसीसीने त्यांना योग्य वाटेल तसा निर्णय घ्यावा आणि बीसीसीआयने आयसीसीशी चर्चा करून काय बरोबर आणि काय चुकीचे ते ठरवावे. आयसीसी जो अंतिम निर्णय घेईल तो योग्यच असेल असे मला वाटते.

बीसीसीआय अध्यक्ष राजीव शुक्ला यांची प्रतिक्रिया :

बीसीसीआय अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी धोनीची बाजू घेत म्हटले आहे कि ‘धोनीने बॅज लावून काहीही चुकीचे केलेले नाही कारण यामागे कोणत्याही प्रकारचा व्यापारी, राजकीय अथवा धार्मिक प्रचार केलेला नाहीये. त्याने केवळ भारतीय सेनेचा सन्मान केला आहे.’

किरण रिजेजू , क्रीडा मंत्री :

क्रीडामंत्र्यांनी देखील धोनीला पाठिंबा देत ‘खेळाडू देशासाठी खेळत असल्याने ज्या बाबी देशाच्या अभिमानासंदर्भात अथवा लोकांच्या भावनांशी निगडित असतील त्यासंदर्भात परवानगी बीसीसीआयने सरकारला द्यायला हवी. याबाबतीत क्रीडा संघटना आणि खेळाडूंच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे आहे. ‘ असे स्पष्ट केले.