MS Dhoni होणार मुंबईकर, पत्नी साक्षीनं घराचे शेअर केेलेले फोटो व्हायरल

पोलीसनामा ऑनलाईन – क्रिकेट विश्वात आपला ठसा उमटवणारा भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) आणि त्याचे कुटुंबीय लवकरच रांची सोडून मुंबईत स्थायिक (shift to Mumbai with his family) होणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. धोनीची पत्नी साक्षीने (Sakshi Dhoni ) नुकतेच मुंबईत तयार होत असलेल्या घराचे फोटो तिच्या इंस्टाग्रामवर (on instagram) पोस्ट केल्यानंतर ही चर्चा सुरू झाली आहे.

गेल्या वर्षी झालेल्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होता. कॅप्टन कूल धोनीने ऑगस्ट 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर धोनी कुटुंबीयांसोबत रांचीच्या फार्महाऊसवरच होता. क्रिकेटमधील करिअर यशस्वी झाल्यानंतर त्याने आधीचे घर सोडून 2009 मध्ये हरमू रोडवर तीन मजली घर खरेदी केले होते. या घरात धोनीने 8 वर्ष काढले. त्यानंतर 2017 मध्ये धोनी कैलाशपती फार्म हाऊसमध्ये राहयला गेला.

धोनीचा रांची येथे 7 एकरात भलामोठा फार्म हाऊस आहे. त्यात त्याने आलिशान बंगल्यासह बाईक्स आणि कारसाठी गॅरेज बनवले आहे. उर्वरित जागेवर त्याला सेंद्रिय शेती करायची आहे आणि त्यासाठी त्याने गेल्याच महिन्यात 8 लाख किमतीचा ट्रॅक्टरही खरेदी केला आहे. धोनी मनोरंजन क्षेत्रातही उतरणार आहे आणि गतवर्षी धोनीच्या प्रोडक्शन कंपनीने एक डॉक्युमेंटरीही लाँच केली होती. साक्षी ही त्या कंपनीची मॅनेजिंग डायरेक्टर आहे. त्यासाठी त्याने अंधेरीत एक ऑफिसही खरेदी केले आहे. साक्षीने सोमवारी तिच्या इंस्टा स्टोरीवर मुंबईत तयार होत असलेल्या घराचे फोटो पोस्ट केले. त्यात त्यांच्या घराचे काम सुरू असल्याचे दिसत आहेत. साक्षीने पोस्ट केलेल्या फोटोसारखाच फोटो आर्किटेक्चर डिझायनर शंतनू गर्ग यांनी पोस्ट केला. त्यामुळे धोनी व साक्षी यांच्या स्वप्नातलं घर गर्ग तयार करत असल्याची चर्चा रंगली आहे.