‘MS धोनी जर कर्णधार नसता तर…’ का केले गौतम गंभीरने असे विधान

पोलिसनामा ऑनलाईन – महेंद्रसिंग धोनी कर्णधारच झाला नसता तर अधिक बरे झाले असते, असे विधान माजी क्रिकेटपटू आणि भाजपचे खासदार गौतम गंभीरने केले आहे.विश्वचषक स्पर्धा 2019 च्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताचे आव्हान संपुष्टात आल्यापासून माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले आहे.

महेंद्रसिंग धोनीने कर्णधारपद भूषवले असून, तो तिसर्‍या क्रमांकावर खेळायला आला नाही. जर धोनी कर्णधार नसता, तर तो तिसर्‍या क्रमांकावरील एक उत्तम फलंदाज बनू शकला असता. क्रिकेट जगताला एक पूर्णपणे वेगळा आणि चांगला धोनी बघायला मिळाला असता. तिसर्‍या क्रमांकावर खेळल्याने त्याच्या खूप जास्त धावा काढून खूप विक्रम मोडीत काढले असते. विक्रमांची बातच सोडा, ते तर मोडण्यासाठीच असतात. पण जर तो तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजीसाठी खेळत असता तर त्याने चाहत्यांचे अधिक चांगले मनोरंजन केले असते, अशी खंत गंभीरने क्रिकेट कनेक्टेड कार्यक्रमात व्यक्त केली. फलंदाजीला पोषक असलेल्या खेळपट्टीवर आताच्या गोलंदाजांच्या फळीसमोर धोनीने तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजी केली असती, तर त्याने किती विक्रम मोडीत काढले असते याची गणतीच करता येणार नाही, असेही गंभीर म्हणाला.