नगर शहराचा काही भाग अंधारात : महावितरण कर्मचारी संपावर

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – मुंब्रा, औरंगाबाद व मालेगाव येथील खासगीकरणाला विरोध दर्शविण्यासाठी ‘महावितरण’चे कर्मचारी रविवारी मध्यरात्रीपासून संपावर गेले आहेत. त्यामुळे शहरातील मध्यवस्तीतील काही भागातील नागरिकांना रात्र अंधारातच काढावी लागली.
शहरातील तांबटकर गल्ली, नवीपेठ, चितळे रोड, महाजन गल्ली, रंगारगल्ली यासह इतर काही भागात मध्यरात्री साडेबारा वाजल्यापासून वीजपुरवठा खंडित झाला आहे. सकाळपर्यंत वीज न आल्यामुळे नागरिक तेलीखुंट येथील पॉवर हाऊस येथे विचारणा करण्यासाठी गेले असता कार्यालय बंद होते. वीजपुरवठा नसल्याने पाणी सुटूनही अनेकांना पाणी भरता आले नाही. आठवड्याचा पहिला दिवस असल्याने नोकरदार वर्गाचीही तारोबळ उडाली.
महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी कर्मचारी संपावर गेल्याचे सांगितले आहे. त्यामुळे दुपारपर्यंत वीजपुरवठा सुरळीत होणार नसल्याचे चित्र आहे. लाईट नाही, पाणी नाही यामुळे आधीच त्रस्त असलेल्या नागरिकांना कार्यालयही बंद आढळल्यामुळे महावितरण कर्मचाऱ्यांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
शहर विभागाचे उपअभियंता धर्माधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता कर्मचारी संपावर गेल्याचे त्यांनी सांगितले. शहरात काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला असून दुरुस्तीसाठी खासगी ठेकेदारांचे कर्मचारी पाठविण्यात आले आहेत. फॉल्ट शोधण्याचे काम सुरु असून लवकर वीजपुरवठा सुरु करण्याचा प्रयत्न आहे, असे त्यांनी सांगितले.