मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – MSRTC News | लालपरीच्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. एसटी महामंडळाकडून लवकरच अद्ययावत प्रणाली म्हणजे एसटीमध्ये जीपीएस सिस्टीम (GPS System In ST Bus) बसविण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना आता एसटीचे लाईव्ह लोकेशन मोबाईलवर समजणार आहे. यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार असून, प्रवासदेखील जलदगतीने आणि सुखकर होणार असल्याचे बोलले जात आहे. (ST Bus News)
एकीकडे दळवळणाची साधने वाढली असताना दुसरीकडे राज्यातील अनेक जिल्ह्यात लालपरीच्या फेऱ्या मात्र मर्यादित आहेत. त्यामुळे प्रवाशांना एसटी किती वाजता येणार? हे माहीत नसते. परिणामी बऱ्याचदा प्रवाशांना एसटीची वाट बघत तासनतास ताटकळत राहावे लागते.
मात्र आता राज्य परिवहन महामंडळातील एसटीच्या सर्वच गाड्यांना व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टिम बसविले जाणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना एसटीचे लाईव्ह लोकेशन समजणार असून, तुमची एसटी कुठपर्यंत पोहोचली? गाडीचा मार्ग, एसटीची वेळ, एसटी आगारातील थांब्याची वेळ, थांब्याचे ठिकाण, एसटी आगारात येण्याची अपेक्षित वेळ इत्यादी माहिती प्रवाशांच्या मोबाईल ॲपवर उपलब्ध होणार आहे.
जीपीएस सिस्टीमचे काम ‘रोस मार्टा’ कंपनीला देण्यात आले असून, त्या कंपनीने आता रूट मॅपिंग केले आहे. दरम्यान, या प्रणालीचे सिस्टीममध्ये इंटिग्रेशनही पूर्ण झाले आहे. सध्या या पॅटर्नमधील काही बदलाचे काम सुरू आहे. दरम्यान राज्यातील १५ हजार एसटीमध्ये ही सिस्टीम बसविण्यात येणार असून, ही सिस्टीम मार्च महिन्यात प्रवाशांसाठी उपलब्ध होईल, अशी माहिती या प्रणालीचे मुख्य अधिकारी नितीन मैनाद यांनी दिली आहे.
एसटी महामंडळाचे मुख्य जनसंपर्क अधिकारी अभिजित भोसले म्हणाले, ” सध्या जीपीएस सिस्टीम राज्य परिवहन एसटी महामंडळामध्ये अंतर्गत सुरू आहे. काही अधिकारी आणि कर्मचारी ही जीपीएस सिस्टीम प्रणाली हाताळत आहेत. मात्र ही सेवा पुढील काही दिवसात प्रवाशांसाठी उपलब्ध होणार आहे. “