गणपतीला एसटी बसने जाताय तर मग जाणून घ्या आरक्षणाचे नियम आणि तिकीट दर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई, पुणे, ठाण्यातील चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यास परवानगी मिळती की नाही याबाबत गेले अनेक दिवस कमालीची उत्सुकता लागून होती. मात्र, राज्य सरकारने मंगळवारी मोठा निर्णय घेत कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांना परवानगी दिली आहे. पण त्याकरिता काही नियम पाळावे लागणार असून, त्याचे पालन करुनच जावं लागणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली.

यासंदर्भात बोलताना अनिल परब म्हणाले, गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना आता १४ दिवसांच्या ऐवजी १० दिवसांचे क्वारंटाईन करण्यात येईल. चाकरमान्यांसाठी एसटीच्या ३ हजार विशेष बसगाड्या सोडण्यात येतील. ५ ते १२ ऑगस्ट पर्यंत या गाड्या धावतील. एका बसमध्ये २२ प्रवाशांना प्रवास करता येईल. प्रवासासाठी ई-पास आवश्यक नसेल. मात्र, सर्वाना मास्क अनिवार्य असेल, असे त्यांनी सांगितलं. दरम्यान, परब यांच्या घोषणेनंतर एसटी महामंडळाने गाड्यांचे नियोजन कसे असेल, याचा तपशील जारी करण्यात आला आहे.

कोकणात जाण्यासाठी अशी असेल एसटी बससेवा….

– ५ ते १२ ऑगस्ट मुंबईतुन कोकणात जाण्यासाठी एसटी सेवा.

– २३ ऑगस्टपासून पुढे कोकणातून मुंबईत परत येण्यासाठी एसटी सेवा.

– तिकीटदर नेहमी प्रमाणे असेल.

– १० दिवस विलगीकरणाचा कालावधी.

– ई पासची आवश्यकता नाही.

– एका बसमध्ये २२ प्रवाशी बसू शकतील.

-प्रत्येक प्रवाशाला मास्क बंधनकारक असेल.

– महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन तसेच महामंडळाने नेमलेल्या खासगी एजंटमार्फत ( रेडबस आणि इतर ) तिकीट आरक्षित करता येईल. ४ (रात्री १२ पासून) ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून त्याची सुरुवात करण्यात आली आहे.

– सांघिक आरक्षणासाठी एकाच गावात राहणाऱ्या २२ प्रवाशांनी एकत्र येत त्यांची यादी जवळच्या एसटी स्थानकावर/आगारात जमा करावी.

– यावर्षी रेल्वे सेवा बंद असल्याने गाड्यांची संख्या वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. सध्या ३००० गाड्या असून त्याव्यतिरिक्त अंदाजे ३००० गाड्या सज्ज ठेवण्याच्या सूचना राज्यातील विभागांना देण्यात आल्या आहे.

असा प्रवास करु शकतील चाकरमानी

मुंबईतून कोकणातील प्रमुख बसस्थानकात म्हणजे चिपळूण, गुहागर, खेड, दापोली, कुडाळ, कणकवली, रत्नागिरी अशा ठिकणी गाड्या चालवल्या जातील. येथून गावखेड्यापर्यंत जाण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून बस चालवण्यात येईल.