Mucormycosis : मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचा मोठा निर्णय ! खासगी रूग्णालयांना आणखी एक दणका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाबरोबर आणखी एक संकट निर्माण झाले आहे ते म्हणजे म्युकरमायकोसिसचे  (काळी बुरशी). दिवसेंदिवस या आजाराचे रुग्ण वाढत चालले आहेत. महत्त्वाचे म्हणजे या आजरावरील उपचाराचा खर्च (cost treatment) हे सर्वसामान्यांना न परवडणारे आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने खासगी रुग्णालयातील  म्युकरमायकोसिसवरील उपचाराचे निश्चित केले आहेत. शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोग्य विभागाच्या या अधिसूचनेवर मोहोर उठवली आहे.

उपचाराचे दर निश्चित करताना शहरांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांना  आता उपचारासाठी (cost treatment) अधिक रक्कम मागता येणार नाही. त्याचबरोबर आरोग्य विभागाच्या अधिसूचनेचे पालन होत नसेल तर सक्षम प्राधिकारी म्हणून जिल्हाधिकारी आणि महापालिका क्षेत्रात महापालिका आयुक्त यांना जबाबदार धरले जाणार आहे.

दरम्यान, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर मोफत उपचार करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानुसार महात्मा फुले जनआरोग्य आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत सहभागी रुग्णालयांत म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर मोफत उपचार केले जात आहेत. ही अधिसूचना आजपासून ३१ जुलै २०२१ पर्यंत राज्यभर लागू राहील. रुग्णाला पूर्वलेखापरिक्षित देयक देणे संबंधित रुग्णालयाला बंधनकारक करण्यात आले आहे. याशिवाय जास्त दर आकारणाऱ्या रुग्णालयांवर भरारी पथकांमार्फत पुन्हा तपासणी करण्याची आणि त्यावर कारवाई करण्याची तरतूदही या अधिसूचनेत कायम ठेवली आहे, अशी माहिती राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिली.

व्हेंटिलेटरशिवाय आयसीयू व विलगीकरण:
अ वर्ग
शहरांसाठी ७५०० रुपये,
ब वर्ग शहरांसाठी ५५०० रुपये
क वर्ग शहरांसाठी ४५०० रुपये.

व्हेंटीलेटरसह आयसीयू व विलगीकरण :
अ वर्ग शहरांसाठी ९००० रुपये,
ब वर्ग शहरांसाठी ६७०० रुपये
क वर्ग शहरांसाठी ५४०० रुपये.

शहरांचे वर्गीकरण
अ वर्ग शहरे : मुंबई तसेच महानगर क्षेत्र (मीरा-भाईंदर मनपा, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर मनपा क्षेत्र, अंबरनाथ, कुळगाव-बदलापूर, पनवेल महापालिका), पुणे तसेच पुणे महानगर क्षेत्र, नागपूर (नागपूर मनपा, दिगडोह, वाडी) यांचा समावेश आहे.

ब वर्ग शहरे : नाशिक, अमरावती, औरंगाबाद, भिवंडी, सोलापूर, कोल्हापूर, वसई-विरार, मालेगाव, नांदेड, सांगली यांच्यासह सर्व जिल्हा मुख्यालये यांचा समावेश आहे.

क वर्ग गटात अ आणि ब गटाव्यतिरिक्त इतर शहरे यांचा समावेश करण्यात आला आहे.

राज्य शासनाने म्युकरमायकोसिस आजारात शस्त्रक्रिया हा उपचारातील महत्त्वाचा घटक लक्षात घेत २८ प्रकारच्या शस्त्रक्रियांसाठीचा खर्च निश्चित केला आहे. त्यानुसार या अ वर्ग शहरांमध्ये त्यासाठी १० हजारापासून ते १ लाख रूपयापर्यंत, ब वर्ग शहरांसाठी सात हजार ५०० रुपयांपासून ते ७५ हजारापर्यंत, क वर्गातील शहरांसाठी सहा हजारापासून ते ६० हजारापर्यंत दर ठरवून दिले आहेत.

असे असतील दर
वॉर्डमधील अलगीकरण :
अ वर्ग शहरांसाठी ४००० रुपये,
ब वर्ग शहरांसाठी ३००० रुपये
क वर्ग शहरांसाठी २४०० रुपये
यामध्ये आवश्यक ती देखरेख, नर्सिंग, चाचण्या, औषधी, बेड्सचा खर्च व जेवण यांचा समावेश करण्यात केला आहे मात्र यातून मोठ्या चाचण्या व तपासणी तसेच उच्च पातळीवरील मोठी औषधे यातून वगळली आहेत.

..तर कारवाई अटळ
राज्य सरकारने खासगी हॉस्पिटलला दर निश्चित केले असले तरी अजूनही काही जिल्ह्यांमध्ये रुग्णालये पैसे उकळत आहेत. विशेष म्हणजे खासगी हॉस्पिटलचे जिल्हाधिकारी किंवा महापालिका आयुक्तांकडून ऑडिट केले जात नाही. लोकांच्या तक्रारींमध्ये वाढ होऊ लागल्याने आरोग्य विभागाने कार्यक्षेत्रात किती खासगी हॉस्पिटलची किती रुपयांची बिले माफ केली किंवा किती दंड लावला यासंदर्भात जिह्वाधिकाऱ्यांकडून माहिती मागितली आहे परंतु हि माहिती अद्याप सादर करण्यात आली नाही. त्यामुळे येत्या आठ दिवसांत सक्षम अधिकार्‍यांनी ठोस कृती केली नाही, तर त्यांच्यावरच कारवाईचा बडगा उगारला जाईल, असे मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

READ ALSO THIS :

 

तुमचा रंग सावळा आहे का ? याचे आरोग्यदायी फायदे जाणून व्हाल थक्क !

 

मराठा आरक्षण रद्द होण्यामागे ‘हे’ दोन प्रमुख कायदेशीर मुद्दे; जाणून घ्या