Sachin Vaze Case : प्रकरणाचं नागपूर कनेक्शन? खासदार कुमार केतकर यांनी राज्यसभेत केला ‘हा’ दावा

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   मुकेश अंबांनी (Mukesh Ambani) यांच्या घराबाहेर जिलेटीन स्फोटकांनी भरलेली गाडी साडली होती. मात्र हे जिलेटीन आले कुठून आणि कोणत्या हेतूनं ते देण्यात आले याबाबत चौकशी का केली जात नाही असा सवाल काँग्रेस खासदार कुमार केतकर (Kumar Ketkar) यांनी उपस्थित केला आहे. दिल्लीत सध्या संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात महाराष्ट्रातील सचिन वाझे (Sachin Vaze) प्रकरणाचे पडसाद उमटले आहेत. यावरून कुमार केतकर यांनी हा सवाल उपस्थित केला आहे.

काय म्हणाले कुमार केतकर ?

कुमार केतकर म्हणाले, सध्या महाराष्ट्रात 2 प्रकरणं गाजत आहेत. त्यात स्थानिक पोलीस आणि एनआयए तपास करत आहेत. एक म्हणजे लोकसेभेचे विद्यमान खासदार मोहन डेलकर यांनी दक्षिण मुंबईच्या एका फाईव्ह स्टार हॉटेलात आत्महत्या केली. डेलकर हे 7 वेळा खासदार राहिले होते. त्यांच्या सुसाईड नोट आणि नातेवाईकांच्या म्हणण्याप्रमाणे मोहन डेलकर यांनी मुंबईत आत्महत्या केली कारण त्यांचं दीव दमण आणि इतर राज्यातील सरकारवर विश्वास नव्हता असं त्यांनी सांगितलं.

‘ज्या नागपूरच्या कंपनीत हे जिलेटीन तयार झालं, त्यांची चौकशी का नाही ?’

पुढं बोलताना केतकर म्हणाले, दुसरी घटना म्हणजे मनसुख हिरेन यांचा मृत्यू. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी आढळली होती. त्या गाडी मालकाचा मृतदेह सापडला. त्या प्रकरणाचा एनआयए तपास करत आहे. मात्र या प्रकरणात ज्या नागपूरच्या कंपनीत हे जिलेटीन तयार झालं, ज्यांनी त्याचा पुरवठा केला त्यांची चौकशी का केली जात नाही, जिलेटीन बनवणाऱ्या कंपनीच्या व्यक्तीनं विश्व हिंदू परिषेदच्या माध्यमातून अयोध्येतील राम मंदिरासाठी 15 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. त्यामुळं जिलेटीन कोणी पुरवलं ? कोणत्या हेतून हे जिलेटीन दिलं होतं ? याचीही चौकशी होणं गरजेचं आहे अशी मागणी कुमार केतकर यांनी राज्यसभेत केली.