Mukesh Ambani Bomb Scare : मनसुख हिरेन भेटायला गेलेले ‘तावडे’ नामक अधिकारी कांदिवलीत कोणीही नाहीत, मुंबई पोलिसांचे स्पष्टीकरण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – काही दिवसांपूर्वी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके असलेली स्काॅर्पिओ गाडी आढळून आली होती. त्याचा तपास सुरू असतानाच मुंब्रा येथील रेतीबंदर खाडीजवळ गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. प्राथमिक तपासात पोलिसांनी हिरेन यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला आहे. परंतु, हिरेन यांच्या पत्नीने ते आत्महत्या करणार नसल्याचा दावा केला आहे.

कांदिवली गुन्हे शाखेतून तावडे नावाच्या अधिकाऱ्याने मनसुख यांना फोन करून ठाणे घोडबंदर येथे भेटण्यासाठी बोलावले होते. त्या अधिकाऱ्याला भेटण्यासाठी हिरेन गेल्यानंतर ते पुन्हा परतलेच नाही, असे मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमल हिरेन यांनी सांगितले. त्यानंतर मुंबई पोलिसांनी तावडे नावाचा कांदिवली येथे कोणी अधिकारी नसल्याचे सांगितले. त्यामुळे तो अधिकारी कोण ? तो अधिकारीच होता का ? की आणखीन कोणी ? मनसुख यांच्या मोबाईलवर आलेला तो कॉल नेमका कुणाचा ? याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

मृत्यूची सखोल चौकशी व्हावी
विमल हिरेन यांनी माझे पती आत्महत्या करू शकत नाहीत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे. तपासात ते पोलिसांना सहकार्य करत होते. कालही कांदिवली क्राईम ब्रँचच्या तावडे नावाच्या पोलिसाचा फोन आला. त्या पोलिसाने घोडबंदर येथे भेटायला बोलावले. ते तेथे गेले आणि त्यांचा फोन बंद झाला. मात्र आज बातमी कळली की, त्यांचा मृतदेह मुंब्रा येथे सापडला. त्यांनी आत्महत्या केल्याचे वृत्त चुकीचे आहे. कारण ते कधीच तणावात नव्हते. कधी स्वप्नातही असं वाटलं नव्हतं की आयुष्यात असाही दिवस येईल. त्यामुळे मनसुख हिरेन यांच्या मृत्यूची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी विमल हिरण यांनी केली आहे.

अत्यंत गुंतागुंतीचे आणि आव्हानात्मक हे प्रकरण
विधिमंडळातही हे प्रकरण चांगलेच गाजले. या प्रकरणावरून तपास अधिकारी सचिन वाझेंबद्दल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शंका उपस्थित केली. ते म्हणाले, हे संपूर्ण प्रकरण संशयास्पद असून गृहमंत्री अनिल देशमुख या प्रकरणावर भाष्य का करत नाहीत, हे प्रकरण NIA कडे सोपवण्यात यावं. तसेच जून आणि जुलै २०२० मध्ये याच गाडी मालकासोबत पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचं संभाषण झाल्याचा सीडीआर असल्याचा दावा करत गाडी मालक आणि सचिन वाझे हे आधीपासून एकमेकांना ओळखत होते का? असा प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केला.

अर्णबला अटक केली त्याचा राग का?
देवेंद्र फडणवीसांच्या आरोपाला उत्तर देताना गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले, सचिन वाझेंनी अन्वय नाईक केसमध्ये अर्णब गोस्वामींना अटक केली होती त्याचा राग आहे का? मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास करण्यास महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस सक्षम आहेत. मुब्रा रेतीबंदर येथे मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला, त्यांच्या अंगावर कोणतंही चिन्ह नाही, ठाणे पोलीस अधिक तपास करत आहेत, असंही देशमुख यांनी सांगितले.