मुकेश अंबानींनी लहान भावाकडून दिवाळखोरीत गेलेली ‘ही’ कंपनी घेतली विकत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी त्यांचे बंधू अनिल अंबानी यांच्या मदतीला धावून आले आहेत. अनिल अंबानी यांची दिवाळखोरीत गेलेली रिलायन्स कम्युनिकेशन्स (आरकॉम) ही कंपनी मुकेश अंबानी विकत घेणार आहेत. विशेष म्हणजे यासंदर्भातल्या आराखड्याला स्टेट बँक ऑफ इंडियानं मंजुरी दिली आहे. यामधून २३ हजार कोटी रुपये मिळतील, अशी आशा कर्जपुरवठा केलेल्या बँकांना आहे. स्टेट बँकेनं रिलायन्स कम्युनिकेशन्सला हजारो कोटींचं कर्ज दिलं होतं.

देणेकरांच्या बैठकीचा आज शेवटचा दिवस –
मुकेश अंबानींच्या रिलायन्स जिओनं आरकॉमचे टॉवर आणि फायबर बिझनेस (रिलायन्स इंफ्राटेल) खरेदी करण्यासाठी ४७०० कोटी रुपयांची ऑफर दिली. युव्ही असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीनं (UVARC) आरकॉम आणि रिलायन्स टेलिकॉमच्या मालमत्तेसाठी १४७०० कोटींची बोली लावली. आरकॉमला भारतीय आणि चीनमधील देणेकऱ्यांचे ४३०० कोटी रुपये प्राधान्यानं द्यायचे आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बोर्डनं आरकॉमच्या ठराव योजनेला मंजुरी दिली आहे. यासंदर्भात देणेकऱ्यांच्या बैठकीचा आज शेवटचा दिवस आहे. आरकॉमवरील सुरक्षित कर्जाची रक्कम ३३ हजार कोटींच्या घरात आहे. तर देणेकऱ्यांचा दावा ४९ हजार कोटींचा आहे.

विशेष म्हणजे यापूर्वी एरिक्सन कंपनीची ५०० कोटींची थकबाकी देण्यासाठी मुकेश अंबानी अनिल अंबानी यांच्या मदतीला धावून आले होते. यामुळे अनिल अंबानी यांचा तुरुंगवास टळला होता. कर्ज फेडीसाठी अंबानी यांची विमा, म्युच्युअल फंड व्यवसायाची यापूर्वीच विक्री केली आहे. आता रिलायन्स कम्युनिकेशनची विक्री करुन अनिल अंबानी दूरसंचार क्षेत्रातून माघार घेणार आहेत.