लॉकडाउनमध्येही मुकेश अंबानी यांची कोट्यांची उड्डाणे, दर तासाला 90 कोटींची केली कमाई

पोलीसनामा ऑनलाइन टीम – देशभरात कोरोनाच्या हाहाकारामुळे अनेकांना बेरोजगार व्हावे लागले आहे. मात्र, उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani ) यांनी कोट्यांची शिखरे पार केली आहेत. मार्चपासून सुरू झालेल्या देशव्यापी टाळेबंदीच्या काळात त्यांनी तासाला 90 कोटी रुपये याप्रमाणे कमाई केली आहे. आयआयएफएल वेल्थ हुरून इंडिया’च्या 2020 सालातील धनाढयांची सूची असलेल्या अहवालात हे स्पष्ट करण्यात आले आहे.लॉकडाउनमध्ये भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या सांपत्तिक स्थितीला अर्थव्यवस्थेची कोणतीही बाधा झाली नाही.

त्यांची वैयक्तिक संपत्ती 2,77,700 कोटी रुपयांवरून, 6,58,400 कोटी रुपयांवर गेली आहे. त्यामुळे ते सलग नवव्या वर्षी हुरुन इंडिया सूचीतील सर्वात श्रीमंत भारतीय म्हणून अग्रस्थान सांभाळून आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीज या भारतातील सर्वात मौल्यवान कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष असलेले अंबानी हे जगातील चौथ्या क्रमांकाचे व्यक्ती आहेत.

त्यांनी टेस्लाचे इलॉन मस्क आणि अल्फाबेटचे सहसंस्थापक सर्जी ब्रिन आणि लॅरी पेज यांनाही पिछाडीवर टाकले आहे. जागतिक धनाढ्यांच्या अव्वल पाचांत स्थान मिळविणारे अंबानी एकमेव भारतीय आहेत. उल्लेखनीय म्हणजे या जागतिक सूचीत अंबानी यांचे धनवैभव, हे क्रमवारीत त्यांच्यानंतर असलेल्या पाच धनाढयांच्या एकत्रित संपत्तीइतके आहे.