अंबानींच्या घराजवळ आढळलेली संशयित कार चोरीची, कारमालकाचाही लागला पत्ता; वाचा काय म्हणाले मुंबई पोलिस ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  –  उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर संशयित स्कॉर्पिओ गाडी आढळली. त्यानंतर पोलिसांनी याचा तपास सुरु केल्यानंतर आता याबाबतची माहिती समोर येत आहे. त्यामध्ये ही स्कॉर्पिओ गाडी चोरीची असून, गेल्या काही वर्षांपूर्वीच चोरीला गेल्याचे पोलिसांना समजले. तसेच पोलिसांना कारमालकाचाही पत्ता लागला आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी सांगितले, की संशयित कार काही वर्षांपूर्वी विक्रोळी परिसरातून चोरीला गेली. या गाडीचा चॅसिस नंबरमध्ये छेडछाड झाल्याचे दिसत आहे. मात्र, पोलिसांना या गाडीच्या खऱ्या मालकाचा पत्ता लावण्यात यश मिळाले आहे. गेल्या काही दिवसांत अंबानी कुटुंबियांच्या संबंधित कोणालाही धमकीचे पत्र किंवा कॉल आला नाही. जिथून कार जात होती त्या परिसरातील सीसीटीव्ही फूटेज पोलिसांकडून एकत्रित केले जात आहे. तसेच कारमध्ये मिळालेले जिलेटिन मिलिट्री-ग्रेड जिलेटिन नाही. म्हणजेच स्फोट घडवण्यासाठी लागणाऱ्या साहित्यात याचा वापर केला जात नाही. मिळालेले हे जिलेटिन त्याचा वापर खोदकाम संदर्भातील कामांसाठी केला जातो, असेही पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, गाडीत मिळालेल्या पत्राबाबत पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले, की मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी नीता अंबानी यांना उद्देशून धमकी देणारे पत्र सापडले आहे. यामध्ये लिहिलेला मजकूर इंग्रजी भाषेत आहे. त्यामध्ये हा तर एक ट्रेलर आहे. संपूर्ण कुटुंबाला संपविण्याची तयारी केल्याचे सांगितले. मात्र, या पत्राबाबत अधिकृतरित्या काही सांगितले गेले नाही.