महिंद्रा, टाटा अन् अंबानी एकत्र येऊन देशाला नवी ऊर्जा देणार ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात अनेक महत्वाच्या घोषणा केल्या असून यात हायड्रोजन एनर्जी मिशनचा समावेश आहे.

गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही योजना सुरु करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर आता अर्थमंत्र्यांनी हिरवा कंदिल दाखवला आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी देशातील टाटा, अंबानी आणि महिंद्रा आदी दिग्गज उद्योगपती एकत्र येण्याची शक्यता आहे.

हायड्रोजन एनर्जी मिशनसाठी प्रचंड मोठ्या गुंतवणुकीची गरज असून याकरिता टाटा, अंबानी, महिंद्रा आदी एकत्र येण्याची शक्यता आहे. तसेच इंडियन ऑईल, आयशरसारख्या कंपन्या या प्रकल्पात मोठी भागिदार असू शकतात. या मिशनमुळे ऊर्जा क्षेत्रात आमूलाग्र बदल होतील. याचा परिणाम थेट खनिज तेलाच्या आयातीवर होणार असल्याने याचा लाभ देशाच्या अर्थव्यवस्थेला होणार आहे. भारत जवळपास 80 टक्के खनिज तेल आयात करतो. यामुळे सरकारी तिजोरीवर मोठ्या प्रमाणात दबाव येतो. त्यामुळे पेट्रोल, डिझेलवरील अवलंबित्व दूर करून त्याऐवजी हायड्रोजन वायूचा पर्याय वापरण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. हायड्रोजनचा इंधन म्हणून वापर करण्याच्या प्रयत्नात असलेल्या देशांच्या शर्यतीत आधी भारताचा समावेश नव्हता. मात्र अर्थमंत्री सीतारामन यांच्या घोषणेमुळे आता भारत इंधन निर्मितीच्या नव्या मैदानात उतरला आहे.