काय सांगता ! होय, ‘या’ दिग्गज मंत्र्याने सरकारी कार्यक्रमात चक्क भावालाच मंत्री बनवून पाठवलं, मुख्यमंत्र्यांनी चांगलच झापलं

पाटणा : वृत्त संस्था – बिहार सरकारमध्ये पशु आणि मत्स्य संसाधन विभागाचे मंत्री मुकेश साहनी यांच्यावरून शुक्रवारी बिहार विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात प्रचंड गदरोळ झाला. प्रकरण असे तापले की, मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनासुद्धा मुकेश साहनी यांना फैलावर घ्यावे लागले.

सन ऑफ मल्लाह नावाने प्रसिद्ध मुकेश साहनी अडचणीत सापडले, कारण काही दिवसांपूर्वी वैशाली जिल्ह्यातील हाजीपुरमध्ये एका सरकारी कार्यक्रमात ते स्वत: न जाता त्यांनी आपला छोटा भाऊ संतोष कुमार साहनी यास पाठवले. मंत्री मुकेश साहनी यांचा भाऊ या कार्यक्रमात मंत्र्याची भूमिका पार पाडताना दिसून आला.

सरकारी कार्यक्रमात मंत्र्याऐवजी त्याचा छोटा भाऊ गेल्याच्या मुद्द्यावर शुक्रवारी बिहार विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात जोरदार गोंधळ झाला आणि विरोधी पक्षांनी मुकेश साहनी यांचा राजीनामा मागितला. विरोधकांनी म्हटले की, असे करण्यासाठी मुकेश साहनी यांच्या भावाला अटक करण्यात यावी.

बिहार विधानसभेत जेव्हा मुकेश यांच्यावरून गदारोळ झाला, त्यावेळी मुख्यमंत्री नीतीश कुमार सुद्धा उपस्थित होते. या संपूर्ण प्रकरणाबाबत त्यांना समजताच त्यांनी सभागृहात म्हटले की, सरकारी कार्यक्रमात मंत्र्याच्या ऐवजी त्याचा भाऊ गेल्याबाबत मला माहिती नव्हते. या संपूर्ण प्रकरणावर आश्चर्य व्यक्त करत नीतीश कुमार यांनी म्हटले की, असे झाले नाही पाहिजे, मी स्वत: याप्रकरणात लक्ष घालेन.

नीतीश कुमार यांनी विधानसभेत म्हटले, मला याबाबत माहिती नव्हते. जर हे खरे असेल तर खुप धक्कादायक प्रकरण आहे.

यानंतर नीतीश कुमार यांनी मुकेश साहनी यांना बोलावले आणि चांगलेच फैलावर घेतले. मात्र, नीतीश कुमार यांच्याशी भेट होण्यापूर्वी मुकेश साहनी जोशातच होते. या वादानंतर मीडियाने जेव्हा मुकेश साहनी यांना प्रश्न विचारले तेव्हा त्यांनी आव्हान देत म्हटले की – पाहुयात कुणात किती दम आहे.

नीतीश कुमार यांची भेट घेतल्यानंतर मुकेश साहनी यांचा जोश उतरल्याचे दिसून आले. मुख्यमंत्र्यांनी शाळा घेतल्यानंतर मुकेश साहनी मीडियाच्या समोर आले आणि त्यांनी सरकारी कार्यक्रमात आपल्या भावाला पाठवल्याबद्दल माफी मागितली.