मुलायमसिंग यादव हॉस्पिलटमध्ये दाखल, ‘कोरोना’ टेस्टचाही रिपोर्ट आला

लखनऊ : वृत्तसंस्था –  उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते मुलायमसिंग यादव यांना अस्वस्थ वाटू लागल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांना लखनऊमधल्या मेदांत हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांची तातडीने कोरोना टेस्टही करण्यात आली. कोरोना टेस्टचा निकालही आला असून टेस्ट निगेटिव्ह आल्याची माहिती हॉस्पिटलचे संचालक डॉ. राकेश कपूर यांनी दिली आहे.

मुलायमसिंग यादव हे 80 वर्षाचे असून गेल्या काही वर्षापासून त्यांची प्रकृती साथ देत नाही. या आधीही त्यांना मेदांतामध्येच दाखल करण्यात आले होतं. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धमेंद्र प्रधान यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. धमेंद्र प्रधान यांना उपचारासाठी हरियाणातील गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. अमित शाह यांनाही याच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. धमेंद्र प्रधान यांनी आपली कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचे ट्विट करुन सांगितले होते.