SriLanka serial blasts : ३ FiveStar हॉटेलसह ‘या’ ठिकाणी बॉम्बस्फोट ; १६५ ठार , ३५० जखमी

कोलंबो : वृत्तसंस्था – श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये आज ईस्टर संडे साजरा होत असताना शहरातील तीन चर्च आणि फाइव्ह स्टार हॉटेलांमध्ये साखळी बॉम्बस्फोट घडवण्यात आले. सकाळी ८. ४५ वाजता  झालेल्या बॉम्बस्फोटात १६५ ठार  तर ३५० हून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. यात विदेशी पर्यटकांचाही समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जगभरात ईस्टर संडे साजरा होत असताना श्रीलंकेतील कोलंबो साखळी बॉम्बस्फोटांनी हादरले आहे.  कोलंबोमधील शँग्रिला , किंग्सबरी आणि सिनामन ग्रँड हॉटेलमध्ये तसेच कोलंबो बंदराजवळील सेंट अँथनी चर्च, बट्टीकलोआ चर्च,  सॅबेस्टिअन चर्च या तीन चर्चमध्ये  बॉम्बस्फोट घडवण्यात आले.  यात १६४ लोक ठार  तर ३५० हून अधिक लोक जखमी  झाले आहेत. तर मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.   बॉम्बस्फोटाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, कोणत्याही दहशतवादी संघटनेनं अद्याप या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली नाही.

भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी कोलंबोतील बॉम्बस्फोटांच्या घटनेची दखल घेतली आहे. कोलंबोतील भारतीय उच्चायुक्तांच्या संपर्कात आहोत. तेथील परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे, असं त्यांनी सांगितलं आहे. तसेच भारतीय नागरिकांना मदतीसाठी  +९४७७७९०२०८२ +९४७७२२३४१७६ या नंबरवर संपर्क सांधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.