श्रीलंका ८ स्फोटांच्या मालिकेने हादरली, २०७ ठार, ७ अटकेत

कोलंबो : वृत्तसंस्था – श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये आज ईस्टर संडे साजरा होत असताना शहरातील चर्च आणि हॉटेलमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले. या बॉम्बस्फोटात आत्तापर्यंत २०७ जणांचा मृत्यू झाला असून ४०० हून अधिक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये ३५ विदेशी पर्य़टकांचा समावेश आहे. घटना आज सकाळी घडली असून सकाळी सहा स्फोट झाले. पाच तासानंतर आणखी दोन स्फोट घडवण्यात आले असल्याचे कोलंबो पोलिसांनी सांगितले.

पाच तासानंतर घडवण्यात आलेल्या स्फोटामध्ये दोन जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. या प्रकरणात आत्तापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे भारतातही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर श्रीलंका सरकारने श्रीलंकेत संचारबंदीचे आदेश दिले आहेत. या घटनेचा जगभरातून निषेध केला जात आहे.

साखळी स्फोटानंतर श्रीलंका सरकारने फेसबुक, ट्विटर असे सोशल मीडिया काही काळासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे रॉयटर्स इंडिया या वृत्तसंस्थेने दिले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, येथील चर्च आणि फाइव्ह स्टार हॉटेलांमध्ये एकूण ८ बॉम्बस्फोट झाले. यात २०७ ठार झाले असून, ४००हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. बट्टीकलोआ येथील चर्चमध्ये बॉम्बस्फोट झाल्याचं पोलिसांनी सांगितलं.