माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा सर्जिकल स्ट्राईकबाबत पहिल्यांदाच गौप्यस्फोट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सर्जिकल स्ट्राईकबाबत पहिल्यांदाच गौप्यस्फोट केला आहे. युपीए सरकारच्या काळातही सर्जिकल स्ट्राइकही झाले होते, पण आम्ही मतांसाठी त्याचा वापर केला नाही. मोदी सरकार आर्थिक स्तरावरील अपयश लपवण्यासाठी लष्कराच्या शौर्याचा फायदा घेत असून हे लाजिरवाणं आहे’, असं विधान मनमोहन सिंग यांनी केलं आहे.

सध्या लोकसभा निवडणुकीचा जोरदार प्रचार सुरु असून मोदी सरकार एअर स्ट्राइकचा उल्लेख करत मतं मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. या गोष्टीवर टीका करताना मनमोहन सिंग टीका करताना म्हटलं आहे की , ‘आम्ही शत्रुला सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून उत्तर दिलं. पण त्याचं कधी राजकारण केलं नाही. UPAच्या काळात देखील सैन्याला दहशतवादाविरोधात कारवाई करण्यास मुभा देण्यात आली होती. ‘

मुंबई हल्ल्यानंतर १४ दिवसांच्या आत हाफिज सईदला जागतिक दहशतवादी घोषित कऱण्यात यश –

भाजपाध्यक्ष अमित शाह आणि केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांनी मुंबई २६/११ दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करत मनमोहन सिंग यांच्यावर निशाणा साधला होता. त्याला प्रत्युत्तर देताना मनमोहन सिंग म्हणाले की , ‘२००८ मध्ये झालेल्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर भारतदेखील लष्कर कारवाई करु शकत होता. युपीए सरकार लष्करी कारवाई करण्यास तयार नव्हतं या आरोपाशी मी सहमत नाही.

आम्ही पाकिस्तानला पूर्ण वेगळं पाडण्याचा आणि त्यांचा चेहरा जगासमोर उघड कऱण्याचा निर्णय घेतला होता. तसंच दहशतवाद्यांविरोधात निर्णायक कारवाई करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरुन दबाव आणण्याचाही भूमिका आम्ही घेतली होती. आम्हाला यामध्ये यशही मिळालं होतं. मुंबई हल्ल्यानंतर १४ दिवसांच्या आत हाफिज सईदला जागतिक दहशतवादी घोषित करण्यात आले. युपीए सरकारने मुंबई हल्ल्याच्या मास्टरमाइंडवर अमेरिकेकडून १० लाख डॉलर्सचं बक्षीसही जाहीर करुन घेतलं. फरक फक्त इतकाच आहे की आम्ही यासंबंधी कधी जाहीरात केली नाही . ‘