Coronavirus : ‘कोरोना’मुळं मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वाहतुकीसाठी बंद ! पण, ‘ही’ वाहने असणार सुरू, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात येत आहेत. कोरनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवी मुंबईहून पुण्याला जाणारा एक्सप्रेस वे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. 31 मार्चपर्यंत या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. करोरनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनानं आता कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे.

एक्स्प्रेस वे एसटी आणि खाजगी बसेससाठी वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून हलकी वाहने सुरु राहणार आहेत. अतिअवश्यक सेवा मात्र हायवेवरुन सुरु राहणार आहे. हलकी वाहने सुरु राहणार आहेत. मात्र 5 पेक्षा अधिक जणांना वाहनातून एक्सप्रेसने जाता येणार नाहीत. अत्यावश्यक असेल तरच प्रवास करावा अशी माहिती महामार्ग पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी दिली.

महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या 89 तर देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 427 वर पोहचली आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून रविवारी जनता कर्फ्यू पाळण्यात आला होता. रविवारी संध्याकाळी महाराष्ट्रात अचानक 15 जणांचा टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या वाढली.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार 15 ते 20 रुग्णांना संसर्गातून कोरोना झाला आहे. त्यामुळे हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशसनाकडून वारंवार आवाहन करूनही अनेक ठिकाणी गांभीर्याने न घेण्याऱ्यांसाठी आता थेट प्रशासन कारवाई करणार आहे. तसे राज्य सरकारला केंद्राकडून निर्देशही देण्यात आले आहेत. मुंबई-पुण्यात अनेक नागरिकांची कामानिमित्तानं ये-जा सुरु असते. हा संसर्ग आणखी वाढू नये यासाठी एक्सप्रेस वेवरची वाहतूक पूर्ण बंद करण्यात आली आहे.

ज्यांचे घर पुण्यात आहे आणि मुंबईहून पुण्याला जात अशा नागरिकांना फक्त पोलीस एक्सप्रेसवरून सोडत आहेत. ज्यांचं घर मुंबईत आहे ते पुण्यावरून येत असतील तर अशा नागरिकांनाही जाण्यास परवानगी दिली जात आहे. मात्र, प्रवास किंवा टूर किंवा कामासाठी जाणाऱ्या नागरिकांना एक्सप्रेस वेवरून जाण्यासाठी बंदी घातली आहे. पुण्याहून येणारे नागरिक मुंबईत घर असेल तर येऊ शकतात. दोन्ही प्रवेशद्वारावर बॅरिकेट्स लावून एक्सप्रेस वे बंद करण्यात आला आहे. तसेच दोन्ही ठिकाणी पोलिसांची कुमक तैनात करण्यात आली आहे.