कडक सॅल्यूट ! भीषण अग्नीतांडवात स्वत:चा जीव धोक्यात घालून त्याने तिरंगा वाचवला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   भांडूपमधील ड्रीम मॉलमध्ये लागलेल्या आगीत सनराईस हॉस्पिटलमधील १० जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले आहेत. अग्निशमन दलाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली आहे. दरम्यान, या ठिकाणी लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवताना एक अनोखा फोटोही समोर आला आहे. त्या ठिकाणी लागलेल्या आगीच्या ज्वालांमध्ये आपला तिरंगा ध्वजही येणार होता. परंतु। अग्निशमन दलाच्या एका जवानाने आपल्या जीवाची बाजी लावून तिरंगा सुरक्षित खाली उतरवला आहे.

ड्रीम्स मॉलमधील हिल्या मजल्याला आग लागली आणि त्याचा धूर सर्वांत वरच्या मजल्यावर असलेल्या सनराईज रुग्णालयापर्यंत पोहोचला. आगीच्या ज्वालांमध्ये आपला तिरंगा ध्वजही येणार होता. ही बाब एका अग्निशमन दलाच्या जवानाच्या लक्षात आली, त्याने जीवाची बाजी लावून तिरंगा सुरक्षितरित्या सन्मानपूर्वक खाली आणला आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या, की मी पहिल्यांदाच एखाद्या मॉलमध्ये रुग्णालय असल्याचे पाहत आहे. या प्रकरणी नक्कीच कडक कारवाई होईल. या रुग्णालयातील कोरोना रुग्णांना अन्य रुग्णालयात दाखल केल्याचे महापौरांनी सांगितले. दरम्यान, व्हेंटिलेटरवरील रुग्णांना हलविण्यासाठी वेळ लागला. अन्य कोरोना रुग्णांना तातडीने हलविण्यात आले. यात व्हेंटिलेटरवरील रुग्णांचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले आहे. या प्रकरणाचीही चौकशी होईल. अशा घटना होऊ नयेत म्हणून राज्यात ज्या ठिकाणी कोविड हॉस्पिटल, जम्बो सेंटर उभारले आहेत, त्याचे फायर ऑडिट करण्याचे आदेश दिल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगितले.