मुंबईत ३ वर्षांत १३३ कैदी एचआयव्ही बाधित

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईयेथील आर्थर रोड तसेच भायखळा करागृहातील कैद्यांना मोठ्याप्रमाणात एचआयव्हीची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मागील ३ वर्षांत १३३ जणांना एचआयव्ही झाल्याचं निदान झालं आहे. एचआयव्हीचे निदान झाल्यानंत या कैद्यांवर उपचार सुरू आहेत. आर्थर रोड तुरुंगात डिसेंबर, २०१८ मध्ये सुरू करण्यात आलेल्या एआरटी केंद्रात डिसेंबर ते मार्च या कालावधीत २६ नवीन एचआयव्ही रुग्ण आढळून आलेत. पुरूषांच्या तुलनेत महिलांमध्ये या आजाराचं प्रमाण सर्वाधिक आहे.

२०१६-१७ या कालावधीत ४,५८६ कैद्यांची डॉक्टरांनी एचआयव्ही चाचणी केली. यात ५८ कैद्यांना एचआयव्ही होता. २०१७-१८ या वर्षांत ४,५१७ कैद्यांची तपासणी केली असता २७ कैदी एचआयव्ही पॉझिटीव्ह असल्याचं आढळलं आहे. तसेच २०१८-१९ या काळात ६,०६९ कैद्यांची एचआयव्ही चाचणी केली असता या चाचणीत ४८ जणांना हा आजार झाल्याचे समोर स्पष्ट झाले. तुरुंगात संसर्गजन्य आजार होणाऱ्या कैद्यांची संख्या सर्वाधिक आहे. त्यातच आता एचआयव्ही असणारे रुग्णही अधिक आहेत. वेळीच आजाराचं निदान व उपचार न मिळाल्याने कैद्यांचा मृत्यू होतो. यासाठी तुरुंगात एचआयव्ही तपासणी करण्यात येते.

त्यानुसार एचआयव्ही चाचणीत पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांवर सध्या एआरटी केंद्राद्वारे उपचार सुरू आहेत. मुंबईतील भायखळा जेल आणि आर्थर रोड तुरुंगातील कैद्यांना प्राथमिक उपचार आणि औषधांसाठी जे. जे. रुग्णालयात किंवा केईएम रुग्णालयात आणलं जातं. या ठिकाणच्या एआरटी केंद्रात या कैद्यांची तपासणी होते. गरज पडल्यास दाखल करून घेतलं जातं. परंतु, अशा प्रकरणात अनेकदा कैदी संधी साधून रुग्णालयातून पळून जातात. त्यामुळे अशा घटना टाळण्यासाठी तुरुंगातच एचआयव्हीबाधित रुग्णांसाठी एआरटी केंद्र सुरू करण्यात आलं आहे.

या केंद्राद्वारे डिसेंबर २०१८ पासून आतापर्यंत २६ नवीन एचआयव्ही रुग्ण आढळून आले आहेत. यातील १९ रुग्ण उपचारांवर असून सात जणांची तुरुंगातून सुटका झाली आहे. विशेषतः या रुग्णांना तुरुंगात आल्यावर एचआयव्हीची लागण होते हे सांगणं कठीण आहे. कारण तुरुंगात हलवल्यावर त्याची एचआयव्ही चाचणी केली जाते. रुग्णाला गरज असल्यास डॉक्टर ही चाचणी करण्याचा सल्ला देतात. त्यानुसार कैदी एचआयव्ही बाधित असल्याचं समोर येतं.

तुरुंगात शिक्षेसाठी आलेले कैदी विविध गुन्ह्यांमुळे येथे येतात. या कैंद्यांना दारू व अंमली पदार्थांचे सेवन करण्याचं व्यसन असतं. यामुळे अनेकदा या व्यक्तींना आधीच एचआयव्ही संसर्ग झालेला असतो. पण अनेकदा हे समजत नाही. तुरुंगात असल्याने लैंगिक सुखापासून हे वंचित राहतात. अशावेळी विविध पर्याय हे निवडतात. असुरक्षित लैंगिक संबंध आल्यास या कैंद्यांना आजाराची लागण होते. त्यामुळे तुरुंगात कैद्याला हलवण्यापूर्वी त्यांची एचआयव्ही चाचणी करून घेणं गरजेचं आहे.