26/11 हल्ला : दहशतवादी कसाबला जिवंत पकडणार्‍या 14 पोलिसांना ‘पदोन्नती’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – २६/११ रोजी मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्याने संपूर्ण देश हादरला होता, परंतु हा हल्ला करणाऱ्यांपैकी कसाब नावाच्या अतिरेक्याला जिवंत पकडण्याची मोलाची कामगिरी १४ पोलीस अधिकाऱ्यांनी केली होती. त्या १४ पोलीस अधिकाऱ्यांना बढती देण्याचा महत्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.

कसाबला पकडण्यात तुकाराम ओंबळे हे शहीद झाले होते. शहीद तुकाराम ओंबळेंसह अन्य १४ अधिकाऱ्यांनी कसाबला पकडण्यात महत्वाची जबाबदारी पार पाडली होती. या कामगिरीसाठी त्यांना एका रँकनं पदोन्नती देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यापूर्वीही या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना अनेक सन्मानांनी गौरविण्यात आले आहे.

२६ नोव्हेंबर २००८ रोजी कसाबने पाकिस्तानातून समुद्रामागे मुंबईत प्रवेश केला होता. त्याने आणि त्याच्या सहकारी दहशतवाद्यांनी मुंबईतील विविध ठिकाणी हल्ले चढवले होते, त्यात १८ सुरक्षा कमर्चारी आणि १६६ नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले होते. हल्लेखोरांपैकी इस्माइल खान व अजमल कसाब हे दहशतवादी स्कोडा कार घेऊन पळून जाण्याच्या प्रयत्नात होते, त्यावेळी गिरगाव येथील पोलिसांनी त्यांची कार अडवून त्यांना वेढले. पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली त्यात इस्माईल खान ठार झाला आणि अजमल कसाब हा जिवंत पकडला गेला.

२१ नोव्हेंबर २०१२ रोजी कसाबला फाशी झाली होती. जिवंत सापडल्यामुळे या भ्याड हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे समोर आले होते. संपूर्ण जगासमोर पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाटला होता. याच कामगिरीची दखल घेऊन पोलिसांना बक्षीस देण्यात आले आहे.