ठाकरे सरकारचा पुन्हा एकदा फडणवीसांना दणका, आरे कारशेडचा निर्णय गुंडाळला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – तत्कालीन फडणवीस सरकारनं मुंबईतील आरे कारशेडबाबत घेतलेला निर्णय रद्द करत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घेतला आहे. एकप्रकारे तो निर्णय म्हणजे फडणवीसांना आणखी एक धक्का मानला जातो आहे. आरे हा जंगलाचा भाग असल्याचं सांगत मेट्रो कारशेड आता कांजुरमार्ग येथे उभारण्यात येईल अशी मोठी आणि महत्वाची घोषणा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज (रविवार) राज्यातील जनतेशी संवाद साधताना केली आहे.

ठाकरे सरकारनं गेल्या वर्षभरापासून रेंगाळलेल्या मेट्रो कारशेडचा मुद्दा अखेर मार्गी लावला आहे. आरेमधील तब्बल 800 एकरचा परिसर हा आता जंगल म्हणून घोषित केला आहे. तो परिसर जंगल म्हणून घोषित केल्यानंतर मेट्रो कारशेडचं काय होणार असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, आता मेट्रो कारशेड कांजुरमार्ग येथे उभारण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. कांजुरमार्ग येथील जागा शासनाची आहे. त्यामुळे या कामासाठी खर्च येणार नसल्याचं सांगितलं तसेच सरकार ती जागा कारशेडसाठी शून्य रूपये किंमतीवर देणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

आरेमध्ये जी इमारत उभारण्यात आली आहे त्याचा वापर देखील दुसर्‍या कामासाठी केला जाणार आहे. त्यामुळे तिथं झालेला 100 कोटींचा खर्च देखील वाया जाणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मेट्रो कारशेड रद्द करण्यासाठी पर्यावरण प्रेमींनी विरोध करत आंदोलने केली. त्यावेळी अनेकांवर गुन्हे नोंदविण्यात आले होते. आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेण्यात आल्याचे देखील मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले आहे. ठाकरे सरकारचा हा निर्णय म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीस यांना आणखी एक दणका मानला जात आहे.