मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Mumbai Accident News | होळी दहन करून घरी येत असताना दुचाकी अपघातात मामा आणि भाचा यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. प्रल्हाद माळी (वय- २५, रा. भिणार) व त्यांचा भाचा मनोज जोगारी (वय- २०, रा. वरठापाडा, भिणार) अशी या मृत मामा-भाचे यांची नावे आहेत. ही घटना मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पारोळ येथे शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास घडली.
अधिक माहितीनुसार, प्रल्हाद व मनोज दोघे होळी दहनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी ढेकाले येथे गेले होते. ते दुचाकीवरून परत येत असताना मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ढेकाले गावाजवळ दुचाकीवरील नियंत्रण सुटून संरक्षक भिंतीला दुचाकीची जोरदार धडक बसली. या धडकेत या दोघांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेची नोंद मांडवी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या घटनेबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.